क्वारंटाईनचा कालावधी कमी केल्यास सरपंच राजीनामा देणार…

1511
2
Google search engine
Google search engine
Google search engine

जिल्हा सरपंच संघटनेची भूमिका; स्वॅब टेस्ट निगेटिव्ह असल्यास हरकत नाही…

कणकवली,ता.१४:  चतुर्थीसणासाठी सिंधदुुर्गात येणार्‍या चाकरमान्यांना 7 दिवस क्वारंटाईन करण्याचा निर्णय झाला तर सर्व सरपंच आपल्या संनियंत्रण समितीचा राजीनामा देतील अशी भूमिका आज जिल्हा सरपंच संघटनेने जाहीर केली. तर स्वॅब टेस्ट निगेटिव्ह असलेल्या चाकरमान्यांच्या जिल्हा प्रवेशास आमची हरकत नसल्याचे सरपंच संघटनेचे अध्यक्ष संतोष राणे यांनी येथे स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष संतोष राणे यांनी आज कणकवलीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पिसेकामते सरपंच सुहास राणे, ओटव सरपंच हेमंत परुळेकर, करंजे सरपंच मंगेश तळगांवकर, आशिये सरपंच रश्मी बाणे आदी उपस्थित होते.
संतोष राणे म्हणाले, केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने क्वारंटाईनसाठी 14 दिवसांचा कालावधी निश्‍चित केला आहे. तर चतुर्थीसाठी येणार्‍या चाकरमान्यांसाठी 7 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी करण्याबाबत धोरण आखले जात आहे. तशी मागणी विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी देखील केली आहे. मात्र क्वारंटाईन कालावधी कमी करण्याला आमचा विरोध आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी आपापल्या गावात कोरोनाची साथ येऊ नये यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे. त्यात क्वारंटाईन कालावधी कमी केल्यास जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे.
दरम्यान मुंबईहून येणार्‍या चाकरमान्यांनी ते कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल आणला तसेच त्याची पुष्टी जिल्हा आरोग्य विभागाने केली तर अशा चाकरमान्यांना गावात येण्याबाबत आमची कोणतीच हरकत नाही. मात्र चाकरमान्यांच्या जिल्हा प्रवेशाबाबत जिल्हा प्रशासनाने सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना एकत्रित बोलावून निर्णय घ्यावा असेही श्री.राणे म्हणाले.

चाकरमान्यांसाठी मोफत प्रवास हवा
परराज्यातील व्यक्तींना त्यांच्या गावापर्यंत जाण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मोफत व्यवस्था करून दिली. त्याच धर्तीवर कोकणात येणार्‍या चाकरमान्यांसाठी राज्याने मोफत सुविधा उपलब्ध करावी अशी सरपंच संघटनेची मागणी असल्याचे श्री.राणे म्हणाले.

\