ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांचे प्रांताधिकार्यांना पत्र
कणकवली, ता.१४ :
मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाच्या झाल्याचा नमुना कणकवलीत पुन्हा संरक्षण भिंत कोसळल्यानंतर दिसून आला. त्यानंतर कणकवलीतील नागरिकांनी महामार्ग रस्ता रोको करत ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार कणकवली पोलिसांनी कणकवली प्रांत अधिकारी यांना आयपीसी १३३ प्रमाणे चौकशी करून आम्हाला गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र द्यावे, अशी पोलिसांनी भूमिका घेतली आहे.
राजकीय पक्षाचे नेते व नागरिकांनी काम बंदच्या इशाऱ्यावर तोपर्यंत कणकवलीत काम बंद ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे.भगदाड पडल्याची घटना घडलेल्या ठिकाणी पुन्हा अपघात होऊ नये याकरता पोलिसांनी २४ तास बंदोबस्त ठेवला आहे.तसेच सदर वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे.दरम्यान काल घडलेल्या प्रकारानंतर दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीकडून कणकवलीत काम सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा माध्यमातून पोलीस बंदोबस्त मागण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.पोलीस बंदोबस्त या परिस्थितीत देता येणार नसल्याची भूमिका पोलीस अधीक्षकांनी घेतल्याचे समजते.सध्यातरी कणकवलीत महामार्ग बॉक्सवेल संरक्षण भिंत कोसळल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर कणकवलीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.