परशुराम उपरकर; तात्काळ अहवाल प्राप्त झाल्यास, यंत्रणेवरील ताण कमी होईल…
कणकवली ता.१५: नागपूर-औरंगाबाद जिल्ह्यांच्या धर्तीवर सिंधुदुर्गात सुद्धा एंटीजेन तपासणी कीट द्वारे कोरोनाची तपासणी नोझल स्वँबमार्फत करण्यात यावी,जेणेकरून गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना १५ ते ३० मिनिटात अहवाल प्राप्त होईल,व संशयित रुग्णांना कोविड उपचारासाठी पाठवून,जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करता येईल,अशी मागणी मनसेचे नेते परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.दरम्यान ही यंत्रणा शासनाकडून कोरोनासाठी प्राप्त झालेल्या निधीतून किंवा जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून उभारण्यात यावी,असेही त्यांनी यावेळी सांगितले.याबाबत त्यांनी निवेदन दिले.
त्यात म्हटल्याप्रमाणे, नागपूर-औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एंटीजेन तपासणी किट द्वारे कोरोनाची तपासणी नोझल स्वॅबमार्फत केली जाते,ही तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल पंधरा ते तीस मिनिटात प्राप्त होतो,असे वृत्त चार दिवसापूर्वी प्रसारित झाले आहे.तर याला जागतिक आरोग्य संस्था व इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांचीही मान्यता आहे.त्यामुळे एंटीजेन तपासणी कीट यंत्रणा सिंधुदुर्गात चाकरमानी येणार्या सीमांवर बसविल्यास त्या ठिकाणी तात्काळ त्यांचे अहवाल घेता येतील,व संशयित रुग्णांना उपचारासाठी पाठवता येईल,तसेच अन्य रुग्णांना जिल्ह्यात प्रवेश देऊन त्यांना सात दिवस विलगीकरणात ठेवून त्यानंतर गणेशोत्सवात सुखरूप प्रवेश देता येईल,त्यामुळे चाकरमानी आल्यानंतर मे महिन्या सारखी परिस्थिती जिल्ह्यात उद्भवणार नाही,मात्र या तपासणीसाठी शासनाने ४५० रुपये ठरविले असले तरी, ही टेस्ट सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी ५० ते ७० टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात यावी,अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.