डॉ.जयेंद्र परुळेकर; जिल्हा वासियांनी गणेशोत्सव दीड दिवसांचा साजरा करावा…
सावंतवाडी ता.१५: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,गणेशोत्सवासाठी मुंबई-पुणे येथून सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांनी यावर्षी याठिकाणी येणे टाळणेचं जिल्ह्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने हिताचे आहे,असे मत जिल्ह्यातील डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे मांडले.दरम्यान जिल्हावासियांनी सुद्धा घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव हा गर्दी होऊ न देता दीड दिवसाचाच साजरा करून, जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
त्यात म्हटल्याप्रमाणे,ऑगस्ट महिन्यात होत असलेल्या गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊ इच्छिणारे अनेक हजारो चाकरमान्यांमुळे कोरोना संक्रमणाची शक्यता आहे.या निमित्ताने होत असलेल्या चर्चा व राजकीय विधानांमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे आणि भितीचे वातावरण आहे.प्रतिवर्षी गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून जवळपास तीन ते चार लाखांहुन अधिक चाकरमानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असतात.मात्र या वर्षी कोरोना साथरोगामुळे तशी परिस्थिती नाही.मुंबईमध्ये कोरोना साथ मोठ्या प्रमाणावर पसरलेली असून अनेक दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत.अशा संकटकाळी खरंतर मुंबईतून चाकरमान्यांनी आपला गाव आपला जिल्हा सुरक्षित राहावा म्हणून यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणेच टाळणे हे महत्त्वाचे आहे.तसे आवाहन त्यांना करणे गरजेचे आहे.जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक व घरगुती गणपती हे या वर्षी दिड दिवसाचे ठेऊन गर्दी कुठेही होऊ नये याची काळजी जिल्हावासियांनी घेणे गरजेचे आहे.
मुंबई व पुण्यातील पारंपारिक आणि छोट्या मोठ्या सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी घेतलेली गणेशोत्सवाबाबतची भूमिका अतिशय कौतुकास्पद आहे.ज्यांना मुंबई पुण्यासह कोरोना हाॅटस्पाॅट भागातून गणपती निमित्त येणे गरजेचेच असेल त्यांना शासकीय क्वारंटाईनमध्ये १४ दिवस ठेवणे बंधनकारक असावे.अन्यथा जिल्हाप्रवेश करण्या अगोदर ४८ तासातील RT PCR टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक असणे गरजेचे आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात टेस्टिंग सुविधा मर्यादित आहेत. त्यामुळे अचानक हजारोंच्या संख्येने चाकरमानी आल्यास सर्वांची टेस्ट करून वेळेत रिपोर्ट मिळणे शक्य होणार नाही.जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा मर्यादित स्वरूपाची आहे.आयसीयू व वेंटीलेटरस् ची संख्या जिल्ह्यात फारच कमी आहे.अशावेळी जर गणेशोत्सव काळात येत असलेल्या चाकरमान्यांमुळे साथ मोठ्या प्रमाणावर पसरली तर हाहाकार उडेल.त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव साध्यापध्दतीने साजरा करण्यात यावा,असे आवाहन त्यांनी केले आहे.