बॉक्सेलची दुरुस्ती नको, जानवली पुलापर्यंत उड्डाणपूल हवा..

272
2
Google search engine
Google search engine
Google search engine

समीर नलावडे यांची मागणी ; वैफल्यग्रस्त झाल्याने पारकर, सावंतांची टीका

कणकवली, ता.१५: कणकवली शहरातील उड्डाणपुलाला जोडणारा संपूर्ण बॉक्सेल धोकादायक झालाय. त्यामुळे दुरुस्ती नको तर जानवली नदीपुलापर्यंतचा बॉक्सेल काढून तेथे उड्डाणपूल बांधा अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज दिली. तर संदेश पारकर आणि सतीश सावंत हे वैफल्यग्रस्त झाल्याने आमदार राणेंवर टीका करत असल्याचेही ते म्हणाले.
येथील नगराध्यक्ष दालनात नगराध्यक्ष श्री.नलावडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक बंडू हर्णे, शिशिर परुळेकर, अभिजित हर्णे आदी उपस्थित होते.
श्री.नलावडे म्हणाले, महामार्ग चौपदरीकरणाच्या निकृष्ट कामाबाबत आम्ही सुरवातीपासूनच आंदोलन केले. गतवर्षीच्या आंदोलनावेळी आमदार नीतेश राणेसह आम्हा सर्व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्यावेळी सतीश सावंत हे भिरवंडे येथे लपून बसले होते. तर पारकरांनी आमच्यावर टीका करण्यातच धन्यता मानली. आता बॉक्सेलची भिंत कोसळल्यानंतर आमचे आंदोलन योग्यच याची खात्री आता सर्वांना पटली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन आम्ही हायवे ठेकेदाराच्या चुकीच्या कामाबाबत यापुढेही आवाज उठवत राहणार आहोत.
श्री.नलावडे म्हणाले, बॉक्सेल भिंत कोसळल्यानंतर आमदार नीतेश राणे हे तातडीने घटनास्थळी गेले. त्यांनी हायवे ठेकेदाराने केलेल्या चुकीच्या आक्रमक भूमिका घेतली. राणेच्या या भूमिकेला संदेश पारकर यांनीही तेथे पाठिंबा दिला होता. मात्र अर्ध्यातासानंतर पारकरांनी आपली भूमिका बदलली आणि राणेंवर टीका केली. तसेच जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत हे देखील आमदार राणेंवर नाहक टीका करत आहेत. खरे तर सावंत हे विधानसभेत तर पारकर हे नगराध्यक्ष निवडणुकीत पराभूत झाल्याने वैफल्यग्रस्त झाले आहेत.
दरम्यान शहरात झालेल्या बॉक्सेलला आम्ही सुरवातीपासूनच विरोध केला होता. आता बॉक्सेलचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने जानवली नदी ते एस.एम.हायस्कूलपर्यंत संपूर्ण बॉक्सेल काढून टाकून तेथे उड्डाणपूल बांधला जावा अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी केंद्र शासन पातळीपर्यंत आम्ही आवाज उठविणार असल्याचे श्री.नलावडे म्हणाले.

\