ग्रामस्थांची गैरसोय; गेले दोन-तीन दिवस होणाऱ्या अतिवृष्टीचा परिणाम…
कुडाळ ता.१५: गेले दोन-तीन दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे बांबुळी-देऊळवाडी येथील पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक विहीर कोसळून जमीनदोस्त झाली.ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली.दरम्यान ही विहीर कोसळल्यामुळे या विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या आठ ते दहा कुटुंबीयांची भर पावसाळ्यात सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे.
गेले काही दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.याच पावसाचा फटका या विहीरीला बसला.अचानकपणे ही विहीर पुर्णपणे कोसळून जमीनदोस्त झाली.विहीरीचे चिरेबंदी बांधकाम व कठडा विहीरीतच कोसळला.या वाडीतील सुमारे ८ ते १० कुटुंबातील ५० ते ६० नागरीक पिण्याच्या पाण्यासाठी या सार्वजनिक विहिरीचा वापर करत होते. आता ती विहीरच जमीनदोस्त झाल्याने पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
या नुकसानीचा पंचनामा सरपंच चंद्रशेखर बांबुळकर,उपसरपंच किशोर परब, ग्रा.पं.सदस्य अजिंक्य मुंडले,कोतवाल मनोज परब, ग्रा.पं.कर्मचारी गणेश परब आदींसह ग्रामस्थांच्या उपस्थित करण्यात आला.यावेळी विजय पेडणेकर, रामदास कोचरेकर, सुरज पेडणेकर यांंच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.