सिंधुदुर्ग आरपीआयचा आरोप; काम थांबवून चौकशी करण्याची मागणी…
ओरोस ता १५:
मुंबई-गोवा महामार्गावरिल कसाल व ओरोस येथील रस्ता व पुलाचे काम निकृष्ट झाले आहे. वेळीच लक्ष न दिल्यास येथे कणकवली सारखी परिस्थिती ओढवू शकते. त्यामुळे येथील काम तात्काळ थांबवून सबंधित कंपनी कडून पुन्हा काम करून घ्यावे. तसेच ठेकेदार कंपनी आणि जबाबदार अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) सिंधुदुर्ग अध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याकडे बुधवारी केली.
यावेळी चर्मकार समाजाचे दादा पाताडे, किशोर जाधव, प्रसाद सावंत, सुधाकर जाधव, सूरज जाधव, सोमा जाधव, आकाश कदम, सुशांत कदम आदी उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात ‘काम निकृष्ट झाल्याने येथून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. पहिल्याच पावसात पुलांच्या अनेक भागातुन पाण्याचे फवारे मारले जात आहेत. अनेक भागांत पाणी साचत आहे. कणकवली सारखाच प्रकार ओरोस येथे घडू नये यासाठी सुरु असलेले काम त्वरित थांबवून योग्य रीतीने काम करून घ्यावे. निकृष्ट काम केल्या बद्दल कंपनी मालक, इंजीनियर व सबंधित अधिकारी यांच्यावर कठोर दंडात्मक कार्यवाही करून फौजदारी दाखल करावी.’ अशी मागणी केली आहे.
वेताळ बांबार्डे येथील डोंगर कोसळण्याची शक्यता
आरपीआय जिल्हाध्यक्ष कदम यांनी यावेळी आणखी एक निवेदने जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांना दिले आहे. यात ‘मुंबई-गोवा महामार्गासाठी लागणारी माती वेताळ बांबार्डे येथील डोंगरातील खोदण्यात आली. प्रशासनाने करारनामा करून ही परवानगी दिली होती. परंतु ठेकेदार कंपनीने काही अधिकारी व जमीन मालक यांना हाताशी धरून बकायदेशिरपणे डोंगरच पोखरून काढला आहे. यामुळे भविष्यात हा डोंगर कोसळून जीवित हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जमीन मालक, सबंधित अधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्यावर फौजदारी कारवाई करावी,’ अशी मागणी केली आहे.