भाजपाचा आरोप; नगरसेविका अनारोजीन लोबो यांचा बोलविता धनी वेगळा…
सावंतवाडी,ता.१६: नगराध्यक्ष संजू परब यांनी शहराच्या विकासासाठी शंभर कोटींची गुंतवणूक करून जो प्रकल्प आणण्याचा निर्णय घेतला आहे, त्या प्रकल्पांना विरोध करून शिवसेनेचे पदाधिकारी अप्रत्यक्षरीत्या दीपक केसरकर यांना “डॅमेज” करण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोप आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजप युवा कार्यकर्ते निशांत तोरसकर यांनी आज येथे केला.
दरम्यान नगरसेवक अनारोजीन लोबो यांचा बोलविता धनी वेगळा आहे. अशाप्रकारे कणकवलीत सुद्धा प्रकल्प उभारण्यात आले. त्यावेळी तुमची निष्ठा कोठे गेली होती?, असाही सवाल यावेळी त्यांनी व्यक्त केला. काल या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन, नगराध्यक्ष संजु परब यांच्यासह राणे कुटुंबीयांवर टीका केली होती. याला श्री.तोरसकर यांनी प्रत्युत्तर दिले. यावे अजय गोंदावळे दिलीप भालेकर, परिणीता वर्तक, केतन आजगावकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.
श्री तोरसकर पुढे म्हणाले,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे नगराध्यक्षांनी नगरपालिकेकडे येणाऱ्या निधीतून प्रकल्प उभारून बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे हा त्यांचा हेतू आहे. तेथील नागरिकांना व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होईल. तसेच अनारोजीन लोबो यांनी या परत गेलेले प्रकल्पाचे पाच कोटी आणावे व येथील विकास करून दाखवावा, तसेच आम्ही या वक्तव्याचा निषेध करतो. शिवसेनेला येत्या निवडणुकीत येथील सुजाण नागरिक त्यांना त्यांची जागा दाखवून देईल,असे त्यांनी यावेळी सांगितले.