भिंत कोसळल्यानंतर आमदारांचा पुन्हा ड्रामा.
कणकवली, ता.१६.कणकवलीचे आमदार नीतेश राणे यांनी शहरातील सर्व प्रकल्पग्रस्त, स्टॉलधारक, गाळेधारक यांची निव्वळ फसवणूक केली आहे. चार दिवसापूर्वी उड्डाणपुलाची भिंत कोसळल्यानंतर तर त्यांनी मोठा ड्रामा करून महिला अधिकार्याला अपमानीत केले असल्याचा आरोप नगरपंचायतीचे विरोधी पक्ष गटनेते सुशांत नाईक यांनी आज केला.
कणकवलीतील विरोधी पक्ष नगरसेवक सुशांत नाईक यांच्यासह कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले उपस्थित होते.
श्री.नाईक म्हणाले, कणकवलीतील प्रकल्पबाधितांनी समाधानकारक मोबदला, स्टॉल आणि गाळे धारकांचे पुनर्वसन आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. ठेकेदाराला शहर हद्दीत काम देखील सुरू करू दिले नव्हते. मात्र आमदार नीतेश राणे यांनी एका वकिलांना घेऊन शासकीय विश्रामगृहात शहरातील प्रकल्पग्रस्त, स्टॉल आणि गाळे धारकांची बैठक लावली. यात सर्वांना न्याय मिळवून देणार असल्याची ग्वाही देत कणकवली शहरात ठेकेदाराला काम सुरू करायला लावले. त्यानंतर चौपदरीकरणाच्या कामाने गती घेतली तर स्टॉल धारक, गाळेधारकांची फसवणूक झाली. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातील प्रकल्पग्रस्तांनाही समाधानकारक मोबदला मिळालेला नाही.
श्री.नाईक म्हणाले, उड्डाणपुलाची भिंत कोसळल्यानंतर आमदार नीतेश राणे यांनी तेथे घेऊन मोठा ड्रामा केला. यावेळी समोर महिला अधिकारी आहेत याचेही भान त्यांना राहिले नाही. त्या महिला अधिकार्यांना अपमानीत व्हावे लागले अशी भाषा आमदारांनी वापरली हे अशोभनीय आहे. तर चिखलफेक आंदोलनावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत कुठे होते असे नगराध्यक्ष समीर नलावडे विचारत आहेत. मात्र या आंदोलनावेळी गोट्या सावंत कुठे होते? याचेही उत्तर त्यांनी द्यायला हवे. दरम्यान नगरपंचायतीच्या दिरंगाईमुळे शहरातील किनई रस्त्याचे डांबरीकरण रखडले असल्याचा आरोप श्री.नाईक यांनी केला. तसेच शहरात बॉक्सेल नको तर जानवली पुलापर्यंत उड्डाणपूल हवा अशी मागणी आम्ही केंद्राकडे करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.