मनसेची विद्युत वितरणकडे मागणी; दंड-व्याज आकारू नका,अन्यथा आंदोलन…
कणकवली ता.१७: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळातील वीज बिले ग्राहकांना शासनाच्या सूचनेनुसार टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा द्यावी,तसेच ऑनलाईन अथवा इतर भरणा होणाऱ्या वीज बिलावर कोणत्याही प्रकारचा दंड किंवा व्याज आकारू नये,अशी मागणी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दयानंद मेस्त्री यांनी येथील विद्युत वितरणच्या कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे.दरम्यान या मागणीचा विचार न झाल्यास मनसेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल,असाही इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.याबाबत त्यांनी आज निवेदन दिले.
त्यात असे म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात ग्राहकांना आपणाकडून विजबील देण्यात आलेली नाहीत.लॉकडाऊन असल्यामुळे आपल्याला ग्राहकांच्या घरी जाऊन रिडींग घेता आले नाही.आत्ता लॉकडाऊनबाबत शिथीलता मिळताच आपली यंत्रणा विज ग्राहकांच्या मिटरची रिडींग घेत आहे.आज लॉकडाऊनमुळे शासनाने विजबील हे टप्प्याटप्प्याने भरण्याची विजग्राहकांना सूट देण्यात यावी,अशा सुचना आपणांस दिल्या आहेत.तशाचप्रकारे विज बील आकारताना आपणाकडून घेण्यात येणारे रिडींग हे देखिल लॉकडाऊन कालावधीच्या टप्याचे भाग (महिने) पाडून विजबील आकारणा होणे अत्यावश्यक आहे.तसेच ऑनलाईन अथवा इतरत्र भरणा होणाऱ्या विजबीलांवर कोणत्याही स्वरूपाचा दंड,व्याज आकारणा होणार नाही,याची दक्षता घेण्यात यावी.वरील सर्व बाबींचा महावितरणने परीपूर्ण विचार करून जनतेला योग्य न्याय द्यावा.अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आंदोलनाचा पवित्रा अंगिकारावा लागेल.