आबिद नाईक; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी…
कणकवली ता.१७: येथे कोसळलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या बॉक्सवेलच्या कामाची चौकशी करण्यात यावी,तसेच या कामास जबाबदार असणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक आबिद नाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.याबाबत यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात,असे म्हटले आहे की,
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम दिलीप बिल्डकॉन या कंपनीला मिळाले आहे. परंतु या कंपनीने आडमुठेपणाच्या धोरणामुळे व त्यांच्या मनमानी कारभारामुळे प्रचंड प्रमाणात जनतेत राग आहे. गेली तीन वर्षे काम चालू झाल्यापासून कामाच्या निकृष्टपणामुळे बऱ्याच ठिकाणी अपघात होऊन बळी गेले आहेत. मात्र संबंधित राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व दिलीप बिल्डकॉनचे अधिकारी यांना कामाच्या दर्जाबाबत सर्व गोष्टी निदर्शनाला आणून दिल्या होत्या. निकृष्ट कामाबाबत तक्रारी केल्या, आंदोलने झाली, परंतु या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून दादागिरी करून तशाच पद्धतीचे काम चालू ठेवले आहे. त्यामुळे काम चालू असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामामुळे वाहनचालक व जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच तपासणी पथक पाठवून दर्जा तपासणी करून बांधलेली पुल, बॉक्सवेल,सर्विस रोड हे वाहतुकीस योग्य आहेत की नाही हे तपासण्यासाठी कारवाई व्हावी व मुंबई-गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामांबाबत संबंधित असलेल्या दोषींवर कठोर कारवाई व्हावी असे या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.