गाडीचे नुकसान; पर्यायी मार्गाचा प्रश्न आता पुन्हा उपस्थित होणार..
सावंतवाडी/अमोल टेंबकर.ता,१७: आंबोली घाटात कोसळलेल्या दरडीचा काही भाग वनविभागाच्या गस्ती पथकाच्या गाडीवर कोसळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.यावेळी गाडीतून प्रवास करणारे आंबोली वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव आणि त्यांचा चालक जेराॅव डीसोझा हे दोघे सुदैवाने बचावले.ही घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घाटात घडली.यात गाडीचे मात्र नुकसान झाले आहे.याबाबत श्री.जाधव यांनी माहिती दिली.
ते म्हणाले, केवळ देवाच्या कृपेमुळे आम्ही वाचलो,गाडी सावंतवाडीच्या दिशेने जात असताना समोरच दरडीचा काही भाग कोसळला.त्यातील काही दगड गाडीवर कोसळली,यात गाडीचे नुकसान झाले आहे.घाटात गस्त घालत असताना हा प्रकार घडला,असे त्यांनी सांगितले.यापूर्वी आंबोलीचा घाट बऱ्याच वेळा कोसळला आहे.मात्र थेट गाडीवर दरड कोसळण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.मुख्य म्हणजे रस्ता वगळता अन्य भाग हा वनविभागाच्या ताब्यात आहे.रस्ता रुंदीकरण करण्यासाठी अनेक अडचणी आहे.पर्यायी रस्त्याचा प्रश्न गेले अनेक वर्षे प्रलंबित आहे.त्यामुळे आता या घटनेनंतर आंबोली घाटातून प्रवास करणाऱ्यांना भीती निर्माण झाली आहे.