कृषी विभागाकडून कोकण विभागाला पुरेसा रासायनिक खताचा साठा  

71
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी.ता,१७:  चालू खरीप हंगामात कोकण विभागात- ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुख्यत: भात व फळपिकांचे क्षेत्र असून खरीप हंगामासाठी लागणाऱ्या कृषी निविष्ठा, त्यामध्ये बियाणे व रासायनिक खतांची उपलब्धता सर्व जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहितीझाली आहे.  कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील यांनी दिली.
कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर त्यांच्या मागणीनुसार जुलै महिन्याच्या १५ तारखेपर्यंत युरिया खताची मागणी ३१४३० मे. टन एवढी होती त्यानुसार ३३८५८ मे. टन युरियाची उपलब्धता झाली आहे.  मंजूर आवंटनापेक्षा १०८ टक्के उपलब्धता झाली असून ती शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोच करण्यात आलेली आहे. भात पिकाचे बियाणे ५ एप्रिल पासूनच उपलब्ध होऊन शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार केलेल्या आहेत. माहे जून मध्ये पुरेसा पाऊस झाल्याने रोपांची उगवण चांगली होऊन लागण सुरु झालेली आहे. त्याकरिता लागणारा रासायनिक खताचा साठा कृषी निविष्ठा केंद्रावर उपलब्ध करून शेतकऱ्यांपर्यंत पुरवठा करण्यात आला आहे. कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व निविष्ठा केंद्रांची विशेष तपासणी मोहीम घेऊन सर्व विक्री केंद्रे तपासण्यात आली. विक्री केंद्रामध्ये दर फलक लावणे, मागेल त्याप्रमाणे निविष्ठा देणे व सर्व नोंदी व्यवस्थित ठेवण्याबाबत कडक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्याही विक्रेत्याने जादा दराने खते, बियाणे विकलेले आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाही करण्यात येईल अशा सूचनाही सर्व विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत.
कोकण विभागात, मुख्यत: युरिया, डी.ए.पी. व नत्रयुक्त मिश्रखते जिल्ह्याच्या मागणीनुसार व कृषी आयुक्तालयाने मंजूर केलेल्या आवंटनाप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. कोकण विभागात शेतकऱ्यांना बांधावर बियाणे व खते पुरवठा योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण १२०० शेतकरी गटामार्फत ४७५० मे. टन आणि ८४३२ क्विंटल बियाणे बांधावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पालघर जिल्ह्यात १२४५ शेतकरी गटामार्फत ६१९६ मे. टन खते आणि १०९४५ क्विंटल बियाणे पुरवठा करण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये २८०७ शेतकरी गटामार्फत ११८९८ मे. टन खते आणि ८५६० क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिली आहेत.  रत्नागिरी जिल्ह्यात २३७६ शेतकरी गटामार्फत १३४६ मे. टन खत आणि २२१० क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९१८ शेतकरी गटामार्फत १३७१ मे. टन खते आणि ५८६१ क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यामुळे कोकण विभागात एकूण 9546 शेतकरी गटांमार्फत २५५६१ मे. टन खते आणि ३६००७ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
कोकण विभागामध्ये जिल्हास्तर व तालुका स्तरावर भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली असून त्यांच्याद्वारे निविष्ठा विक्रीच्या काळ्या बाजारावर अंकुश ठेवला जात आहे. त्यामुळे कोकण विभागात आतापर्यंत बियाणे उगवणीबाबतच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी आलेल्या नाहीत, असे कोकण कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

\