नगरसेवक कामतेकर, हर्णे ; पिलर ब्रिजसाठी आमदार नाईक रस्त्यावर उतरणार का…?
कणकवली,ता,१७: कोसळलेल्या बॉक्सवेलच्या उभारणीला कणकवलीकरांनी प्रचंड विरोध केला. पण सत्ताधार्यांनी पोलिस बंदोबस्त देऊन हे काम पुन्हा सुरू केले आहे. पुढील काळात बॉक्सवेल कोसळून जीवित हानी झाली तर त्याला सत्ताधारी जबाबदार असतील असा इशारा नगरपंचायत गटनेते संजय कामतेकर आणि नगरसेवक बंडू हर्णे यांनी दिला.
दरम्यान जनतेच्या प्रश्नांसाठी आमदार नीतेश राणे नेहमीच रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत. आमदार वैभव नाईक यांच्यासारखे बंद खोलीत बसून पोपटपंची करत नाहीत. कणकवलीत बॉक्सवेल ऐवजी पिलर ब्रिज व्हावा या मागणीसाठी आमदार नीतेश राणे रस्त्यावर उतरायला तयार आहेत. तेवढी हिंमत आमदार वैभव नाईक दाखवणार का? असेही आव्हान कामतेकर, हर्णे यांनी दिले.
येथील नगराध्यक्ष दालनात संजय कामतेकर आणि बंडू हर्णे यांनी पत्रकार परिषद घेऊन नगरपंचायत विरोधी पक्षगटनेते सुशांत नाईक यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
श्री.हर्णे म्हणाले, कणकवलीकरांचा आवाज आमदार वैभव नाईक यांनी दाबला आहे. बॉक्सवेलची भिंत कधीही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण कणकवलीकरांनी बॉक्सवेल नको तर पिलरब्रिज हवा अशी मागणी केली आहे. परंतु पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांनी पोलिस बंदोबस्तात बॉक्सवेल दुरूस्तीचे काम सुरू करण्यास भाग पाडले आहे. वस्तुतः कणकवलीकरांची बाजू समजून घेऊन आमदार श्री.नाईक यांनी बॉक्सवेल ऐवजी पिलर ब्रिजसाठी आग्रही भूमिका घ्यायला हवी होती. पण आमदार श्री.नाईक यांनी ठेकेदाराला फायदा करून दिला आहे.
नाईक यांचे ठेकेदाराशी संगनमत
कणकवली शहरात गडनदी परिसरात दुतर्फा सर्व्हिस रोड आहे. यातील आमदार वैभव नाईक, नगरसेवक सुशांत नाईक यांनी ठेकेदाराशी संगनमत करून आपल्या घराच्या समोर सर्व्हिस रोडची उंची कमी ठेवली आहे. तर पलीकडच्या बाजूच्या सर्व्हिस रोडची उंची वाढविण्यात आली असा आरोप बंडू हर्णे यांनी केला.