Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडीतील तरुणांनी बांबू लागवडीसाठी पुढे यावे...!

सावंतवाडीतील तरुणांनी बांबू लागवडीसाठी पुढे यावे…!

संजू परबांचे आवाहन; कुडाळच्या बांबू गुरुकुल संस्थेचे काम कौतुकास्पद…

सावंतवाडी ता.१७: कोरोनाच्या काळात अनेक जणांचे नोकरी-व्यवसाय हातातून निसटले आहेत.त्यामुळे अशा तरुणांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.याच पार्श्वभूमीवर कुडाळ येथील बांबू गुरुकुल या संस्थेने केलेला बांबू लागवड प्रकल्प व त्यातून मिळणारे भरगोस उत्पादन लक्षात घेता,असाच प्रकल्प सावंतवाडी तालुक्यात राबवून येथील तरुणांना रोजगार देण्याचा आपला मानस आहे.त्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी व सुशिक्षित बेरोजगार युवकांनी पुढे यावे,असे आवाहन नगराध्यक्ष तथा भाजपाचे प्रवक्ते संजू परब यांनी आज येथे केले.याबाबतची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.
यावेळी बांदा सरपंच अक्रम खान,युनियन बँकेचे वरिष्ठ प्रबंधक संतोष राणे ,महाराष्ट्र बांबू विकास मंडळ समन्वयक अजित भोसले,बांबू गुरुकुलचे संस्थापक सुभाष सावंत,अजय गोंदावळे,बंटी पुरोहित, तसेच बांबू टीमचे भाऊ बागवे,प्रसाद टीळवे, आरती टीळवे,राघव हळदणकर,संदीप पालकर,वेद होडावडेकर,सचिन कदम,विशाल जाधव,नितेश होडावडेकर,ओम पवार आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.परब म्हणाले, आपण नुकताच गाव भेट दौरा केला. या दौऱ्यादरम्यान ग्रामीण भागातील अनेक एक समस्या जाणून घेतल्या. यात कोरोनामुळे अनेक जण मुंबई पुणे येथून आपली नोकरी सोडून गावी आले आहेत. आणि आता त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच दरम्यान आपण कुडाळ येथील बांबू गुरुकुल या संस्थेला भेट दिली. यावेळी त्या ठिकाणी संस्थेकडून घेतले जाणारे उत्पादन व त्यांच्या कडून मिळणारे मार्गदर्शन या सर्व गोष्टी लक्षात घेता, सावंतवाडी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी सुद्धा बांबू लागवड हा प्रकल्प याठिकाणी राबविल्यास त्यातून चांगले उत्पादन मिळू शकते. व रोजगाराचा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे त्यांनी बांबू लागवड या व्यवसायाकडे वळावे, त्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन व सहकार्य महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर यांच्या माध्यमातून केले जाईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे समन्वयक श्री.भोसले म्हणाले, बांबू लागवड हा अतिशय सोपा प्रकल्प आहे. ही लागवड एकदा केल्यावर तिसऱ्या वर्षानंतर त्यातून उत्पादन मिळण्यास सुरवात होते. व ते वर्षानुवर्षे घेता येते. तसेच यासाठी विविध बँकांच्या माध्यमातून सबसिडी व कर्ज उपलब्ध आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना इतर शेत पिकांबरोबरच बांबू लागवड शेतीसुद्धा करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments