भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची मागणी; थकित आर्थिक लाभ त्वरित बँक खात्यात जमा करा…
मालवण,ता.१७: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नोंदीत बांधकाम कामगारांना सद्यपरिस्थितीत वस्तूंची किंवा साहित्याची गरज नाही,तर त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे त्यांचे प्रलंबित असलेले थकीत आर्थिक लाभ त्वरित त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करा,अशी मागणी भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींनी मंडळाच्या बैठकीत केली आहे.याबाबतची माहिती बांधकाम कामगार महासंघाचे प्रदेश संघटनमंत्री हरी चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची बैठक सोमवार दिनांक १३ जुलै २०२० रोजी कामगार मंत्री तथा मंडळ अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे संपन्न झाली.या बैठकीत कामगार आयुक्त, मंडळ सचिव, अधिकारी वर्ग तसेच कामगार प्रतिनिधी म्हणून कामगार महासंघाचे प्रदेश मंत्री तथा मंडळ सदस्य श्रीपाद कुतस्कर व वेदा आगटे हे प्रतिनिधी बैठकीत सहभागी झाले होते.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे, मंडळाच्या बैठकीत नोंदीत बांधकाम कामगारांना त्यांचे पूर्वीचे प्रलंबित आर्थिक लाभाबाबत डोळेझाक करून वस्तूरुपी साहित्य देण्याचा नवीन ठराव करण्याचा घाट घातला जात होता.या वस्तूरुपी साहित्य देण्याच्या ठरावाला अपेक्षित घेताना भारतीय मजदूर संघाने,असे सूचित केले की मंडळाकडून नोंदीत बांधकाम कामगारांना पूर्वीचेच आर्थिक लाभ देण्यात आलेले नाही.या मध्ये लाखो कामगारांना नोंदणी नंतर रुपये ५००० अर्थसहाय्य न देतात ही योजना बंद करण्यात आली आहे।अजूनही नोंदीत कामगार रुपये ५००० हजाराच्या प्रतीक्षेत आहेत.कोरोना पार्श्वभूमीवर मंडळाकडून देण्यात येणारे रुपये२००० निर्वाह भत्ता अद्याप महाराष्ट्रातील ४ लाख नोंदीत बांधकाम कामगारांना मिळालेला नाही. राज्यात १२ लाख कामगार मंडळाजवळ नोंदीत आहेत. यातील बहुतांश कामगारांना मुलांसाठीचे शैक्षणिक लाभ, मृत्यू लाभ, प्रसूती लाभ, गंभीर आजार लाभ व तत्सम आर्थिक लाभ प्रस्तावांचे पैसे मंडळाकडून कामगारांना देण्यात आलेले नाही. याही लाभांच्या बांधकाम कामगार प्रतीक्षेत आहेत.मंडळाकडून यापूर्वी कामगारांना बांधकाम साहित्य किट वाटप करण्यात येत होते.ते महाराष्ट्रातील निम्म्यापेक्षा जास्त कामगारांना वाटप करण्यात आलेले नाही एकंदरीतच महाराष्ट्रातील नोंदीत बांधकाम कामगार अधिकारी वर्गाच्या अनास्थेमुळे पूर्वीच्याच योजनांनपासून वंचित राहिला असताना व सद्यस्थितीतील रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या व आर्थिक दृष्ट्या खंगलेल्या कामगारांना वस्तूरुपी साहित्याची गरज नसून आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.प्रथम कामगारांचे मागील प्रलंबित थकीत आर्थिक लाभाचे 100% वाटप करण्यात यावे, तसेच जे वस्तू रुपी साहित्य देण्याचा घाट घातला जात आहे. त्याऐवजी तेवढीच आर्थिक मदत थेट कामगारांच्या बँक खाती जमा करण्यात यावी, अशी मागणी भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधीनी केल्याची माहिती श्री.चव्हाण यांनी दिली.