रक्षाबंधनासाठी सैनिकांना पाठविल्या १०,१०३ राख्या…

264
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवणातील भंडारी ए.सो.कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा उपक्रम….

मालवण ता.१७: बंधुप्रेमाचे अनोखे नाते सांगणाऱ्या रक्षाबंधन’ या पवित्र सणाच्या निमित्ताने देश रक्षणाचे महानकार्य करणाऱ्या भारतीय सैनिकांना स्वत:च्या हाताने राख्या बनवून पाठविण्याचा अनोखा उपक्रम येथील भंडारी ए.सो.कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही राबविला.यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा व महाविद्यालये बंद असूनही विद्यार्थीनींनी गट करून,घरीच राहून,तब्बल १०,१०३ राख्या बनवून भारतीय वायुदल, नौदल व भूदल (लष्कर) या तिन्ही दलांसाठी राख्या पाठवीत देशाचे रक्षण करणाऱ्या या भावांप्रति प्रेम व्यक्त केले आहे.
या उपक्रमासाठी प्रा. पवन बांदेकर यांनी नियोजन करत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.कोरोना आजाराच्या पार्श्वभूमी असतानाही विद्यार्थिनींचे गट बनवून यावर्षीही दहा हजारच्या वर म्हणजेच १०,१०३ राख्या बनविण्यात आल्या.यासाठी संस्था अध्यक्ष विजय पाटकर, प्राचार्य व्ही.जी. खोत, तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाचेही मार्गदर्शन व सहकार्य लाभले. राख्या पाठविण्यासाठी टेक्नोव्हा, मुंबई चे मालक मंगेश कुलकर्णी यांनी आर्थिक सहकार्य केले.
सोशल डिस्टटिंगचा नियम पाळत या राख्या पाठविण्याचा कार्यक्रम मालवण नगर पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.विद्यार्थिनी बनविलेल्या राख्या पंजाब,अरुणाचल प्रदेश, राजस्थान, मणिपुर, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्किम, जम्मू-कश्मीर, लेह-लहाख, तसेच नौदलासाठी कारवार नेव्ही डॉक, मुंबई नेव्ही, पोरबंदर नेव्ही कोच्ची नेव्ही, विशाखापट्टनम, पोर्ट ब्लेयर-अंदमान व निकोबार, भारतीय वायू दलातील पठाणकोट, हरियाणा, पूलवामा, लेह-लद्दाख, जम्मू-काश्मिर, उधमपूर इत्यादि ठिकाणी कार्यरत असणाऱ्या तीनही सैन्य दलातील सैनिकांना राख्या पाठविण्यात आल्या.
“रक्ताचे नाते असलेला भाऊ फक्त बहिणीचे रक्षण करतो,मात्र आपण भारतमातेचे रक्षण करत आहात व देशसेवेचे पवित्र कार्य आपल्याकडून अविरत घडत राहो, हिच ईश्वर चरणी प्रार्थना” असा शुभ संदेशही राख्यांसोबत सैनिकांना देण्यात आला आहे।अशी माहिती यावेळी प्रा. पवन बांदेकर यांनी दिली.
यावेळी जावडेकर म्हणाले, राख्या पाठविण्याच्या उपक्रमातून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रति प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्याचा विद्यार्थिनींनी केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. देश ही केवळ भौगोलिक सीमा नसून देशातील लोकांच्या कार्यातून देश निर्माण होत असतो.म्हणूनच आपण देशासाठी काय करतो हे जास्त महत्वाचे असून विद्यार्थ्यांनी पुढील जीवनात देशसेवेच्या भावनेने कार्य करावे,असेही जावडेकर म्हणाले. यावेळी प्राचार्य व्ही. जी. खोत यांनीही विद्यार्थीनी व प्राध्यापक वर्गाचे कौतुक करत आभार मानले.
या कार्यक्रमाच्या अनुशंगाने कोरोना योद्धा म्हणून मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना सुचिता केळूसकर हिच्या हस्ते प्रतिकात्मक राखी बांधण्यात आली. तर सर्वाधिक राख्या बनविणाऱ्या चैताली केळुसकर हिच्यासह अन्य विद्यार्थिनींना गौरविण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक हणमंत तिवले, प्रा. पवन बांदेकर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, प्रा. देवेंद्र चव्हाण, प्रा. गुरुदास दळवी, प्रा. प्रभुदास आजगांवकर, प्रा. गणेश सावंत, प्रा. सुनंदा वाईरकर, प्रा. वैभवी वाक्कर, प्रा. सौ. शिल्पा प्रभू, शिक्षिका चिन्मयी कोयंडे आदी व काही निवडक विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर ऑ. जन. सेक्रेटरी साबाजी करलकर तसेच प्राध्यापक वर्ग यांनी या विद्यार्थिनींचे कौतुक केले.

\