दीपक केसरकर; मतदार संघातील लोक पाठीशी याचा आनंद…
सावंतवाडी/अमोल टेंबकर ता.१८: पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करायचा आहे,आणि,तसे स्वप्न उराशी बाळगुन मला जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या विकासासाठी झटायचे आहे.त्यासाठी माझ्या आमदारकीची उरलेली अडीच वर्षे मी झोकुन देवून काम करणार आहे.या काळात राजकारणापेक्षा समाजकारणात लक्ष घालणार आहे,असे मत सावंतवाडीचे आमदार तथा माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केले.आपण आज राजकारणात यशस्वी झालो आहे,मात्र हा सर्व प्रवास करताना काही जवळचे दुखावले आणि दुखावलेले जवळ आले.त्यामुळे थोडेसे दु:ख आणि आनंद सुध्दा आहे.त्यामुळे येणार्या काळात कोणालाही आमदार होणाच्या उकळ्या फुटल्या असल्या,तरी मी माझे काम करत राहणार आहे,असे ही श्री.केसरकर यांनी सांगितले.वाढदिवसाच्या निमीत्ताने श्री.केसरकर यांनी विशेष मुलाखत दिली.
ते म्हणाले,कोरोना सारखी महामारीची परिस्थिती असल्यामुळे माझा वाढदिवस साध्या पध्दतीने आणि सोशल डीस्टंन्सिगचे नियम पाळून साजरा करण्यात यावा,असे आपण कार्यकर्ते व पदाधिकार्यांना आवाहन करीत आहे.मला या काळात मतदार संघात यायचे होते, परंतू माझी तब्येत ठीक नसल्यामुळे काहीश्या प्रमाणात मी मुंबईत राहण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र लवकरच मी जिल्ह्यात दाखल होणार असून आठवड्यातील पाच दिवस मी माझ्या मतदार संघात फीरणार आहे.माझ्यावर मतदार संघात येत नाही,अशी काही विरोधकांकडुन टिका केली जात आहे,परंतू माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे.मला माझ्या तब्येतीची काळजी मुळीच नाही, परंतू माझ्या सारखा सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारा कार्यकर्ता टिकला पाहीजे यासाठी मी काही निर्णय घेतले आहे,परंतू माझ्या मतदार संघातील कामे मार्गी लावण्यासाठी मंत्रायलयाच्या माध्यमातून मी प्रयत्नशिल आहे.त्यामुळे कोणी टिका करण्याची गरज नाही.
श्री केसरकर पुढे म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न पाहून मी राजकारणात आलो. राजकारण हा माझा पिंड नाही, परंतू आता या ठीकाणच्या सर्वसामान्यांचा विकास व्हावा हा उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून,मी काम करीत आहे.मंत्री असताना कोट्यावधी रुपयाचा निधी मी मतदार संघात आणला आहे. तसेच अनेक योजना राबविल्या आहेत. याचा फायदा आणखी काही वर्षानी होईल हे निश्चीत आहे,परंतू जे लोक आज माझ्यावर टिका करीत आहे. त्यांना मी उत्तर देत बसणार नाही, तर दुसरीकडे मी केलेल्या कामाची प्रसिध्दीसुध्दा केलेली नाही. त्यामुळे विरोधकांनी काय म्हटले यावर विचार करण्यापेक्षा माझ्या मतदार संघातील सर्वसामान्य लोक माझ्या पाठीशी आहेत.यातच मला आनंद आहे.
ते म्हणाले,मी मतदार संघात नसल्याने अनेकांना आमदार होण्याची स्वप्न पडत आहे,तर काहींना धुमारे येत आहेत,परंतू काही झाले तरी, येथिल जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहील यात काही शंका नाही.मी नसताना माझ्या काही कार्यकर्त्यांनी यशस्वीरीत्या खिंड लढविली.त्यांचा सुध्दा मला सार्थ अभिमान आहे.ते म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा विकास होण्यासाठी मी कायम पुढाकार घेतला आहे. कोट्यावधी रुपयाचा निधी या ठीकाणी आणला आहे. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सारखा प्रकल्प आणला दोडामार्ग मध्ये सुसज्ज हॉस्पिटल आणि वेंगुर्ला येथिल महिला हॉस्पिटल आणले आहे,मात्र काही राजकीय व्देषी लोक सावंतवाडीत होणारे मल्टीस्पेशालीटी वेत्येत नेण्याचा प्रयत्न केला जात आहे,असे सांगुन मतदार संघात भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. हाच प्रयत्न टर्मिनसच्या बाबतीत निर्माण करण्यात आला होता. त्यावेळी मळगाव आणि मडुरा येथिल लोकांत वाद निर्माण करून देण्यात आले होते,मात्र दोन्ही भाग हे माझ्या मतदार संघातील आहेत.त्यामुळे कोणावर अन्याय मी होवू देणार नाही. आम्ही या ठीकाणी भूमिपुजन करीत असताना राजघराण्याला विश्वासात घेतले होते.त्यावेळी त्यांनी रेडीरेकनरच्या दरानुसार जमिन देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार पुढील चर्चा सुरू आहे. त्यामुळे कोणाला विरोधासाठी विरोध करायचा असेल,तर ते चुकीचे आहे.माझ्या मंत्रीपदाच्या काळात जिल्ह्यातील रस्ते मी डांबरीकरण करुन घेतले.त्याच बरोबर अनेक वर्षे अपुर्ण असलेले पाटबंधारे प्रकल्पांना निधी मिळवून दिला आणि ते प्रकल्प आज ९० टक्के पुर्ण झाले आहेत. याचा मला अभिमान आहे.