कणकवली भाजपाची पोलिसांकडे मागणी;अन्यथा आंदोलनाचा इशारा…
कणकवली ता.१८: पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांचे सुपुत्र गितेश राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी आज कणकवली भाजपच्या वतीने पोलिसांकडे करण्यात आली.याबाबत पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.दरम्यान गीतेश यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात यावी,अन्यथा जिल्हाभरात उग्र आंदोलन करू,असा इशारा यावेळी देण्यात आला.
काल कणकवली येथे गाडी पुढे घेण्यास सांगण्यावरून ट्राफिक पोलीस विश्वजीत परब व गीतेश राऊत यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.त्यानंतर या प्रकरणी भाजपाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.माजी खासदार निलेश राणे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.दरम्यान आज कणकवली भाजपच्या माध्यमातून पोलिसांना निवेदन देण्यात आले.यावेळी गितेश यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा व त्याच्यावर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली.