पाडलोस-केणीवाडा येथील प्रकार; ग्रामस्थांत भितीचे वातावरण…
बांदा,ता.१८: आरोसमध्ये पट्टेरी वाघाने पाळीव कुत्र्याला भक्ष्य केल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री पाडलोस येथील दुचाकीस्वाराला पट्टेरी वाघाने दर्शन दिले. गाडीचा उजेड वाघाच्या डोळ्यावर पडताच दहा ते पंधरा फुटावर असलेल्या वाघाचे रौद्ररुप पाहून दुचाकीस्वार गौरेश पटेकर यांची भितीने गाळणच उडाली. परंतु तत्परता दाखवून स्वतःचा बचाव केल्याने दुर्घटना टळली. वारंवार वनविभागाचे लक्ष वेधूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
पाडलोस-केणीवाडा येथील गौरेश अंकुश पटेकर हे आपले दैनंदिन काम आटोपून रात्री आठ वाजताच्या सुमारास घरी जात होते. त्यांचे घर डोंगराच्या पायथ्याशी असून घनदाट झुडपातून असलेल्या वाटेद्वारे त्यांना जावे लागते. केणीवाडा येथील खेळाचे मैदान पार केल्यानंतर लागणाऱ्या पहिल्याच झुडपांच्या बाहेर पट्टेरी वाघ बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अचानक बसलेला वाघ समोर दिसल्याने श्री.पटेकर घाबरून गेले. त्याच स्थितीत त्यांनी स्वतःला सावरत आपले घर गाठले व कुटुंबियांना सर्व हकीकत सांगितले.चार दिवसांपूर्वी आरोस वरचीवाडी येथे अर्जुन रेडकर यांनी प्रत्यक्ष पट्टेरी वाघ पाहिला होता. त्यानंतर आरोस गावाला लागूनच असलेल्या पाडलोसमध्येही पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याने वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ‘त्या’ वाघास पकडण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
बंदावस्थेतील स्ट्रीटलाईबद्दल नाराजी पटेकर कुटुंबीयांच्या घऱाकडे जाणाऱ्या वाटेवरील स्ट्रीट लाईट अनेक दिवस बंदावस्थेत होती. परिणामी ग्रामस्थांना काळोखातून वाट शोधत घर गाठावे लागले. ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार बल्प घालण्याची विनंती केली होती. परंतु ज्या दिवशी वाघ दिसला त्याच दिवशी स्वखर्चाने बल्प घालण्याची तयारी गौरेश पटेकर यांनी दर्शविली. मात्र,उशीरा ग्रामपंचायतकडून बल्प दिल्याचे गौरेश पटेकर यांनी सांगून नाराजी व्यक्त केली. मडुरा,आरोस पाठोपाठ पाडलोस गावतही पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याने बाजूबाजूलाच असलेल्या गावांना धोका निर्माण झाला आहे. तिन्ही गावांचा जंगलमय भाग एकाच बाजूला असल्याने सदर वाघ वस्तीलगत येत आहे. कोणतीही मनुष्यहानी होण्याअगोदर तरी वनविभागाने यावर उपाययोजना करावी. अन्यथा तीन्ही गावातील ग्रामस्थ वनविभागालाच तोडगा निघेपर्यंत घेराव घालणार असल्याचा इशारा, पाडलोस तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महेश कुबल यांनी दिला आहे.