कधीही कोसळण्याचा धोका; एका बाजूची वाहतूक बंद….
कणकवली, ता.१८: शहरातील उड्डाणपुलाला जोडणार्या भिंतीचा दुसरा भाग देखील धोकादायक झाला असून तो कधीही कोसळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हॉटेल मंजूनाथ ते एस.एम.हायस्कूल अंडरपास पर्यंतचा रस्ता सील करण्यात आला आहे. त्या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आल्याने शहरात वाहतूक कोंडीही निर्माण झाली आहे.
शहरातील एस.एम.हायस्कूलनजीक उड्डाणपुलाला जोडणारी भिंत सात दिवसापूर्वी कोसळली होती. या भागाची डागडुजी ठेकेदाराकडून सुरू आहे. त्यानंतर आता या भिंतीचा दुसर्या बाजूचे सिमेंट बॉक्स बाहेर आले असून ही भिंत देखील कधीही कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही बाब ठेकेदार तसेच महामार्ग अधिकार्यांच्या लक्षात आल्यानंतर हॉटेल मंजूनाथ ते एस.एम.हायस्कूल अंडरपास हा भाग सील करण्यात आला असून, वाहनांसह पादचार्यांनाही तेथे जाण्यास अटकाव करण्यात येत आहे. सर्व्हिस रोडवरील वाहतूक पूर्णःत बंद करण्यात आल्याने, दुसर्या बाजूच्या सर्व्हिस रोड वरून वाहनांची ये-जा केली जात आहे. तसेच महामार्गावरील वाहतूक मसुरकर किनई रोड तसेच भालचंद्र आश्रम रोड वरून वळविण्यात आली आहे. हे दोन्ही रस्ते अरुंद असल्याने महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होत आहे.