उदय सामंतांची ग्वाही : प्रतिष्ठानतर्फे विविध मागण्या सादर
कणकवली,ता.१८: कणकवली शहरातील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानला 25 लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे दिली. त्यांच्या हस्ते प्रतिष्ठानच्या गेल्या 40 वर्षातील वाटचालीचा आढावा असलेल्या पुस्तकाचेही प्रकाशन झाले. तर प्रतिष्ठानच्या उपक्रमांसाठी आर्थिक साहाय्य आणि शासकीय पातळीवर मदतीच्या मागण्यांचे निवेदन प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी दिले.
पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथील आचरेकर प्रतिष्ठानला भेट दिली. त्यांच्यासमवेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष वामन पंडित, आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, नगरसेवक सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, तहसीलदार आर. जे. पवार, अॅड. नारायण देसाई, उमेश वाळके, शरद सावंत, राजेश राजाध्यक्ष, लीना काळसेकर, सार्वजनिक बांधकामचे अधिकारी व इतर उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सांमत यांनी प्रतिष्ठानच्या जागेमध्ये गडनदीकिनारी बांधण्यासाठी तातडीची गरज असलेल्या संरक्षक भिंतीच्या जागेची पाहणी केली. या कामासाठी पहिल्या टप्प्यात जिल्हा नियोजनच्या माध्यमातून 25 लाखांचा निधी देण्याबाबत आपण कार्यवाही कार्यवाही करू अशी ग्वाही दिली.तसेच संरक्षक भिंतीचे अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश बांधकामचे कार्यकारी अभियंता श्री.शेवाळे यांना दिले.
यावेळी संस्थेच्यावतीने मिडिया, मनेजमेंट आणि आर्ट या तिन्ही स्ट्रीमचे महाविद्यालय चालू करण्यास विद्यापीठ आणि यूजीसी स्तरावर परवानगी मिळवून देण्याची व इतर मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यात
नाथ पै एकांकिका स्पर्धेसाठी 25 लाख रुपये एवढी
रक्कम गंगाजळी म्हणून मिळावी. संस्थेच्या नियोजित इमारत बांधकाम व
विस्तारासाठी 50 लाख एवढा निधी मिळावा. संस्थेने रंगभूमीविषयक चालू केलेल्या आणि महाराष्ट्रातील एकमेव रंगभूमी विषयी नियतकालिक असलेल्या ‘रंगवाचा’ त्रैमासिकास आपण व्यक्तिशः: आणि शासन पातळीवर आर्थिक साहाय्य मिळवून द्यावे. सन 2018-19 साठी संस्थेने सांस्कृतिक संचालनालयाकडे केलेल्या इक्वीपमेंट अनुदान व भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत संस्था साहाय्य अनुदान हे दोन्ही अनुदान अर्ज सांस्कृतिक संचालनालयाकडे प्रलंबित आहेत. या दोन्ही अनुदानासाठी संस्था पात्र असल्याने पालकमंत्री या नात्याने त्यात जास्तीत जास्त लक्ष घालून पाठपुरावा करून अनुदान मिळावे, अशी मागणी करण्यात आली. तर
मच्छिंद्र कांबळी स्मृति नाट्यउत्सवासाठी आर्थिक गंगाजळी उभारून द्यावी, अशी मागणी संस्थेच्यावतीने यावेळी करण्यात आली.