कणकवलीत एस.टी. महामंडळाच्या जागेत व्यापारी संकुल होणार…

0
488

पालकमंत्री उदय सामंत;आधुनिकीकरणासाठी १४० गुंठे जागा संपादाबाबतही चर्चा…

कणकवली, ता.१८: शहराच्या मध्यवर्ती असलेल्या एस.टी.बस स्थानक परिसरात भव्य व्यापारी संकुलाची उभारणी प्रस्तावित आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनीही त्यासाठी सकारात्मकता दाखवली असून पुढील बैठकीत कणकवलीच्या प्रस्तावाला मान्यता मिळेल असा विश्‍वास पालकमंत्री उदय सामंत यांनी आज व्यक्त केला. दरम्यान कणकवली बसस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी 140 गुंठे जागा संपादन करण्याचेही प्रस्तावित असल्याचे ते म्हणाले.

कणकवली एस.टी. बसस्थानकाची पाहणी पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केली. त्यांच्यासमवेत आमदार वैभव नाईक, सेना नेते संदेश पारकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे. पवार, विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ, श्री. नेरुरकर, प्रमोद यादव, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, प्रसाद अंधारी व इतर उपस्थित होते.
कणकवली बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाच्या अनुषंाने श्री.सामंत यांनी एस.टी. अधिकार्‍यांशी चर्चा केली. यात एस.टी.महामंडळाकडे सद्यःस्थितीत 8 एकर जागा आहे. यातील अडीच एकर जागा बसस्थानकासाठी तर अडीच एकर जागा डेपोसाठी आवशयक असल्याचे एस.टी.अधिकार्‍यांनी सांगितले. तर उर्वरीत तीन एकर जागेत व्यापारी संकुल उभारण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी बसस्थानक विस्तारीकरणासाठी अडीच एकर ऐवजी साडे तीन एकर जागा आरक्षित ठेवण्याची मागणी केली. तर संदेश पारकर यांनी एस.टी.महामंडळाला आवश्यकता भासली तर आशिये रोडलगतची १४० गुंठे जागा एस.टी.महामंडळासाठी आरक्षित आहे. ही जागा ताब्यात घेण्याचीही सूचना केली.
या चर्चेदरम्यान श्री.सामंत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी मोबाईलववरून संपर्क साधला. यावेळी झालेल्या चर्चेत कणकवलीत व्यापारी संकुल उभारण्याच्या अनुषंगाने सुसज्ज आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने कन्सल्टन्सी नेमून डिझाईन तयार करून घेऊन नंतरच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे श्री. सामंत म्हणाले.
———————–