जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या चाकरमान्यांना आवाहन;ग्राम कृती दल समितीचा निर्णय…
बांदा ता.१९: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या बाहेरून रोणापाल गावात येणाऱ्यांना ७ ऑगस्टपूर्वी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा व स्थानिक प्रशासनाने कोरोना काळात घेतलेल्या काळजीमुळेच आज गावात कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. त्यामुळे शासनाचे नियम बाजूला ठेवून स्थानिक ग्राम कृती दलाने घेतलेलेच निर्णय सर्वांना मान्य करावे लागतील असा एकमुखी निर्णय ग्राम कृती दल समिती व रोणापाल ग्रामस्थांनी घेतला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोणापाल ग्रामपंचायत सभागृहात आयोजित बैठकीत ग्राम कृती दल समिती अध्यक्ष तथा सरपंच सुरेश गावडे, उपसरपंच पप्या केणी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रकाश गावडे, माजी अध्यक्ष बाबल तुयकेर, सहकारी विकास संस्था माजी चेअमरमन अशोक कुबल, माजी सरपंच उदय देऊलकर, स्वयंसेवक बाबु गावडे, निवृत्त शिक्षक विष्णू सावंत, माजी ग्रा.पं.सदस्य मंगेश गावडे, कर्मचारी बाळू देऊलकर, ग्राम कृती समितीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ कृष्णा परब, सदाशिव गाड, बाबा गावडे, बाळू तोरसकर आदी उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.
शासनाचे नियम मान्य नसल्याने गावाच्या आरोग्याच्या दृष्टीने नियमावली जाहीर करण्यात आली. यामध्ये, १४ दिवस संस्थात्मक क्वॉरंटाईन बंधनकारक, गावात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षितता बाळगावी, ७ ऑगस्टनंतर चाकरमान्यांनी चतुर्थीला गावात येऊ नये, संस्थात्मक विलगीकरणाचे दिवस पूर्ण होण्याअगोदर तीन दिवस आरोग्य विभागामार्फत क्वॉरंटाईन असलेल्यांची तपासणी करावी, प्रत्येकाने नातेवाईकांना गणेश चतुर्थी कालावधीत न येण्याचे आवाहन करणे, वाडीतील भजनी मंडळांनी दुसऱ्या वाडीत भजनासाठी न जाणे, ध्वनीक्षेप करू नये, गावाच्या सुरक्षिततेसाठी शासनाच्या नियमावर बोट न ठेवणे असे अनेक नियम तयार केले आहे. सदर नियम कोणावरही लादले नसून त्याचे पालन करण्याचे आवाहन ग्राम कृती दल समितीतर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान, बारावी इयत्तेत खेमराज मेमोरियलमध्ये शिकणाऱ्या ओमकार बाबु गावडे याने ७७.८५ टक्के मिळून तिसरा क्रमांक पटकाविल्याबद्दल गावाच्यावतीने सरपंच सुरेश गावडे यांनी अभिनंदन केले.