समुद्री लाटांचा होतोय मारा; चुकीच्या जागेवर बांधकाम, लाखो रुपये पाण्यात…
वेंगुर्ला ता.१९: वेंगुर्ले येथील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सागरेश्वर समुद्रकिनारी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने पर्यटन वृद्धीसाठीच्या उद्देशाने उभारण्यात आलेला वुड हाऊस प्रकल्प समुद्राच्या लाटांमुळे कोसळण्याच्या स्थितीत आहे. चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या जागेवर बांधकाम झाल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.वेंगुर्ला तालुक्यातील पर्यटनाचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या सागरेश्वर किनारी या ‘‘वुड हाऊस‘‘ प्रकल्पाचे काम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने गेले दीड ते दोन वर्षे सुरु आहे. या प्रकल्पाचे जवळजवळ ८० टक्के काम हे पूर्ण झाले होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे समुद्राच्या लाटांचा जोर वाढून या प्रकल्पासाठी समुद्रकिनाऱ्यावर उभारण्यात आलेला पाया हा धासळण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान मागील दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे समुद्रालाही मोठे उधाण आले होते. शनिवारी (१८ जुलै) रात्रीपासून समुद्राच्या लाटांचा जोर हा पुन्हा वाढला होता. यामुळे आज पहाटे या प्रकल्पाच्या शेवटी असणारे वुड हाऊस हे एकबाजूने खचले असून समुद्रात वाहून जाण्याच्या स्थितीत आहे. शासनाचे लाखो रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या हा प्रकल्प आता समुद्रात वाहून जाण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान या प्रकारची माहिती मिळताच उभादंडा ग्रामविकास अधिकारी अरुण जाधव, तलाठी श्री.गोरड, ग्रामपंचायत सदस्य मधुकर तिरोडकर, आशु फर्नांडिस, पोलीस पाटील विजय नार्वेकर, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हितेश धुरी, भूषण आंगचेकर, ग्रामस्थ डुमिग डिसोजा यांनी तात्काळ याठिकाणी पाहणी केली. याबाबत पाहणीचा अहवाल आम्ही वरिष्ठ पातळीवर व पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडे पाठवणार आहोत असे ग्रामविकास अधिकारी श्री.जाधव यांनी सांगितले. एमटीडीसी विभागामार्फत पर्यटनाच्या नावाखाली पैसे कसे पाण्यात घालवले जातात याचे हे उत्तम उदाहरण आहे. या अगोदर जे जे पकल्प एमटीडीसी ने या सागरेश्वर किनारी राबवले आहेत ते किती यशस्वी झाले याचाही खुलासा त्यांनी करावा. शासनाने या प्रकल्पाची सखोल चौकशी करावी. अशी मागणी भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हितेश धुरी यांनी केली आहे. याबाबत धुरी यांनी महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे ट्विटर द्वारे चौकशीची मागणी केली आहे.