आरोग्य सभापती परीमल नाईक यांचा पुढाकार; नगराध्यक्षांच्या हस्ते शुभारंभ…
सावंतवाडी ता.२०: शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य सभापती परीमल नाईक यांच्या पुढाकारातून सुरु करण्यात आलेल्या डास निर्मूलन मोहिमेचा शुभारंभ नगराध्यक्ष संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येथे करण्यात आला.दरम्यान येथील कंठक पानंद परिसरातून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर,आनंद नेवगी,दिपाली भालेकर,नासिर शेख,सुधीर आडिवरेकर,समृद्धी विरनोडकर,भारती मोरे,दिपाली सावंत,शुभांगी सुकी,उदय नाईक,बंटी पुरोहित उत्कर्षा सासोलकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.नाईक म्हणाले, पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढून किटकजन्य रोगांचा फैलाव वाढण्याची शक्यता आहे.डासांमुळे मलेरिया, चिकनगुन्या, हत्तीरोग यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव होतो.त्यामुळे सावंतवाडी शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून ही मोहीम पालिकेकडून सुरू करण्यात आली आहे.यात विशेषतः कन्स्ट्रक्शन,टायर्स वर्क व भंगार दुकाने याठिकाणी मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचते व त्याठिकाणी डासांचा प्रादुर्भाव होतो.त्यामुळे अशा ठिकाणी जाऊन अबेट लिक्विड टाकून, पाण्याचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.त्यासाठी मुबलक प्रमाणात पालिकेकडे हे जंतुनाशक लिक्विड उपलब्ध आहे,असेही त्यांनी सांगितले.दरम्यान या मोहिमेला शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन श्री.नाईक यांनी केले आहे