अनधिकृत दुकाने हटवली; तीन दिवसात उर्वरित अतिक्रमण हटविण्याच्या सूचना….
पालिकेच्या संत गाडगेबाबा भाजी मंडईत अनधिकृत झोपड्या उभारून दुकाने थाटणार्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे. काही लोकांवर ही कारवाई करण्यात आली, तर उर्वरित लोकांना तीन दिवसात दुकाने काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी सहकार्य करावे, अन्यथा त्यांच्यावर ही कारवाई केली जाईल, असा इशारा नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.
ते पुढे म्हणाले,याठिकाणी अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या या दुकानांमुळे या मोठी गर्दी होत होती.ग्राहकांना खरेदी केल्यानंतर पिशव्या घेऊन जाताना त्रास सहन करावा लागत होता.तर तेथील व्यापाऱ्यांकडूनही याबाबत नाराजी व्यक्त होत होती.या दुकानामुळे त्या ठिकाणी झोपडपट्टीत आल्याचा भास होत होता.त्यामुळे पालिकेच्या सभेत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान ही दुकाने हटविण्यास कोणी विरोध केला,तर त्याची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही,असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गणेश चतुर्थीच्या काळात बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी येथील नारायण मंदिरापासून रामेश्वर प्लाझा पर्यंत बाजार भरविला जाणार आहे.तर केशवसुत कट्ट्याच्या ठिकाणी बॅरिकेट घालण्यात येणार असून पलिकडच्या भागात पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे.चार चाकी मोठ्या वाहनांना येथील गार्डन व गोडाऊन परिसरात पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे,असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आरोग्य सभापती परीमल नाईक,नगरसेवक आनंद नेवगी,सुधीर आडिवरेकर,दिपाली भालेकर,नासिर शेख,समृद्धी विरनोडकर,उत्कर्षा सासोलकर,बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.