प्रमोद जठार; जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनातून मागणी…
ओरोस ता २०: जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एम.आय.डी.सी येथील १०० एकर जागा केंद्रीय आयुर्वेदिक संशोधन केंद्रासाठी देण्यात यावी,अशा मागणीचे निवेदन भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी सोमवारी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात ‘केंद्रीय आयुष मंत्रालय देशातील काही राज्यात नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल प्लांट्स केंद्राची स्थापना करीत आहे.या इंस्टिट्यूटसाठी आयुष मंत्रालयाने १४ जुलै २०२० रोजी लेखी पत्राद्वारे पुन्हा दोडामार्ग आडाळी येथील सरकारी जागेची निवड केली आहे. पूर्वीच्या सरकारने आडाळी गावातील एम आय डी सी च्या ताब्यात असलेली जागा या प्रकल्पासाठी देण्याचे निश्चित केले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सुद्धा ही जागा देण्यास मान्यता दिली होती. एवढी जागा उपलब्ध असल्याचे पत्र शासनाला दिले होते. त्यामुळे या पत्राद्वारे आयुर्वेदिक संशोधन केंद्रासाठी आवश्यक १०० एकर जागा आडाळी एम आय डी सी उपलब्ध करून द्यावी’, अशी विनंती करीत असल्याचे प्रमोद जठार यांनी म्हटले आहे. जागा उपलब्ध असल्याचा परिपूर्ण प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना पाठवावा, अशीही विनंती जठार यांनी या निवेदनात केली आहे.