मालवणातील बॅजो व्यावसायिकांची मागणी; तहसील,पोलीस प्रशासनास निवेदन…
मालवण ता.२०: शहर व तालुक्यातील शेकडो बॅजो व्यावसायिक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.व्यवसाय पूर्णपणे बंद असल्याने त्यांच्यासमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे आगामी गणेशोत्सवात भाविकांच्या मागणीनुसार बाप्पाच्या आगमन-विसर्जनाला बॅजो वाजवण्यास परवानगी मिळावी,अशी मागणी येथील बॅजो व्यावसायिकांनी तहसीलदार अजय पाटणे व पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्याकडे केली आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात म्हटल्याप्रमाणे, कोरोना काळ विचारत घेता सोशल डिस्टन्स नियम,मास्क यासह आपण जी बंधने घालून द्याल त्याचे तंतोतंत पालन करून आम्ही व्यवसाय करू.आमच्या व आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आता याच व्यवसायावर अवलंबून असल्याने आमचा सहानभूतीपुर्वक विचार व्हावा.आमच्या मागण्या शासन दरबारी पोचवून आम्हाला न्याय द्या.अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी मदन कांबळे, बंड्या सरमळकर, साईनाथ बांबूळकर, राजेश कांदळगावकर, नितीन कोळंबकर, गीतेश जोशी, नागेश परब, प्रथमेश सरमळकर, विशाल सरमळकर, विशाल भगत आदी उपस्थित होते. तर तालुक्यातील अन्य व्यवसायिकांची सह्या प्रतही निवेदनासोबत जोडण्यात आली आहे.
यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मालवणातील बॅजो व्यवसायिकांची बैठक जिल्हाध्यक्ष लखन आडेलकर सचिव निलेश तेली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी बॅजो व्यवसाईकांच्या समस्या जाणून घेत एकजुटीने शासन दरबारी न्याय मागणी करण्याबाबत निर्णय झाला.त्या पार्श्वभूमीवर सोमवारी प्रशासनास निवेदन देण्यात आले.