तीनशे युनिट पर्यंतची घरगुती वीज बिले माफ करा…

339
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 वेंगुर्ला भाजपातर्फे वीज उपअभियत्यांना निवेदन…

वेंगुर्लाता.२०:
कोरोना महामारीमुळे देशात आणि राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले असून त्याला आता १०० दिवस लोटले आहे. राज्यसरकारने ३१ जुलैपर्यंत त्यात वाढ केली आहे. या काळात रोजीरोटीच बंद असल्याने उदरनिर्वाह करताना गरीब, कष्टकरी, कनिष्ठ आणि मध्यमवर्गीय या सर्वांचीच आता दमछाक झाली आहे. तीन महिन्यांची वीज देयके येताच जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने दरमहा ३०० युनिट पर्यंत वापर असणारे सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील ३ महिन्यांची वीज देयके माफ करावी अशा मागणीचे लेखी निवेदन वेंगुर्ला तालुका भाजपातर्फे वीज वितरणचे उपअभियंता यांना देण्यात आले.
वीज बिलाच्या वाढलेल्या दरवाढीबाबत आज तालुक्यातील भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेंगुर्ला येथील वीज वितरणच्या उपअभियंत्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवदेनात म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे तीन महिने घरात बसून काढावे लागल्याने हातावर पोट असलेल्या आणि पगारावर अवलंबून असलेल्या सर्वांचीच दमछाक झाली आहे. लॉकडाऊन काही अंशी कमी असले तरी अजूनही अनेकांची रोजीरोटी सुरु झालेली नाही. गाठीशी असलेला थोडाबहुत पैसाही संपत आला आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात उपासमारीची भीती डोकावू लागली आहे. किबहूना घरभाडे भरता आले नाही व वीज बिलही भरता येत नाही.
वीजदर वाढीबद्दल अगोदरच लोकांच्या मनात नाराजी आहे. त्यातच रोजीरोटी सुरु नसताना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न असतानाही लाईट बिले भरण्याचा तगादा सुरु आहे. त्यामुळे लोकांमधील असंतोष वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्य वीज नियमक कायद्यातील कलम ४चा वापर करुन तातडीने सर्व वीज देयकांना स्थगिती देऊन ३०० युनिट पर्यत वीज वापर करणारे सर्व घरगुती वीज ग्राहकांची मागील ३ महिन्यांची वीज देयके माफ करावी. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २० लाख कोटीच्या पॅकेजमध्ये सर्व राज्याच्या वीज वितरण कंपनींना ९० हजार कोटींचे अर्थ सहाय्य जाहीर केलेले आहे. यातील सुमारे ३ हजार कोटी रुपये राज्य सरकार वीज वितरण कंपनीकडे जमा झाले आहेत. यामुळे राज्यातील जनतेची ३०० युनिटपर्यंतची वीज बिल माफ करणे सहज शक्य आहे. त्यामुळे आमची असलेली वीज बिल माफ करण्याची मागणी शासनापर्यंत पोहचवावी असे त्या निवेदना म्हटले आहे.
यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, नगरसेवक धर्मराज कांबळी, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, मच्छिमार नेते दादा केळुसकर, बाबा नाईक, तुळस सरपंच शंकर घारे, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, ज्येष्ठ नेते बाळा सावंत, संतोष शेटकर, समिर कुडाळकर, युवामोर्चाचे संदिप पाटील, प्रणव वायंगणकर, विनय गोरे, दादा तांडेल, समिर चिदरकर, नितिश कुडतरकर, जगन्नाथ राणे, शेखर काणेकर, दशरथ गडेकर, पुंडलिक हळदणकर, राहूल मोर्डेकर, श्रीकृष्ण हळदणकर, कमलाकांत प्रभू, सोनू सावंत, बाळकृष्ण मयेकर, प्रथमेश यंदे, अमेय धुरी, साईप्रसाद भोई आदी उपस्थित होते.

\