अतुल काळसेकर; सिंधुदुर्गातील शेतकरी व मच्छीमारांना लाभ घेण्याचे आवाहन…
मालवण.ता,२१: कोकणातील शेतकरी आणि मच्छीमार अतिरिक्त उत्पन्न म्हणून मत्स्यशेती कडे पाहत आहेत.त्यामुळे सिंधुदुर्गातील मत्स्य शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी भाजपने पहिले पाऊल उचलले आहे.याचा लाभ सिंधुदुर्गातील मत्स्य शेतकऱ्यांनी घ्यावा,असे आवाहन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केले आहे.याबाबतची माहिती प्रसिद्ध पत्रकांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग भाजपा मच्छीमार सेलच्या रविकिरण तोरसकर यांनी दिली.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे, कोकणातील शेतकरी आणि मच्छिमार अतिरिक्त उत्पन्न म्हणून मत्स्यशेती कडे पहात आहेत.मत्स्यपालन करणारा मत्स्य शेतकरी,पिंजऱ्यातील मत्स्यपालन,कातळ वरील मस्त्याबिज प्रकल्प तसेच बायोफ्लाक,खाजगी मालकीचे नैसर्गिक व कृत्रम तलाव सारख्या आधुनिक मत्स्यपालनचे पर्याय अंगिकारत आहेत.पारंपारिक शेती आणि मासेमारी बरोबरच जोडधंदा म्हणून वैयक्तिक किंवा गटाद्वारे सदरची मत्स्यशेती केली जात आहे.गेल्यावर्षी निल क्रांती या मत्स्य व कृषी पर्यटन संस्था व मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाने कांदळगाव,मालवण येथील कातळ वरील हंगामी पाण्यात मत्स्यबीज वाढ प्रकल्प यशस्वी केला होता.त्याचबरोबर हडी, तळा शील ,तोंड वळी, देवली येथील पिंजऱ्यातील खाडीपत्रा मधील मत्स्यपालन सुद्धा व्यावसायिक स्वरूपात पुढे येत आहेत.
मत्स्य व्यवसायातील या नवीन संधीचा लाभ घेण्यासाठी सिंधुदुर्गातील मत्स्य शेतकरी उत्सुक आहेत.मत्स्यशेती मुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून मच्छिमार आणि शेतकरी यांच्या उत्पन्नात पण वाढ होणार आहे.सदर व्यवसायातील संधी आणि अडचणी यांचा अभ्यास करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच भाजप सिंधुदुर्ग तर्फे पूर्व राज्यमंत्री नाम.रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वा खाली अतुल काळसेकर व इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा मालवण तालुक्यात अभ्यास दौरा झाला होता.त्यानंतर झालेल्या भाजपा पक्ष बैठकीत मत्स्य शेती आणि मत्स्य शेतकरी यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचे निश्चित केले आहे.याचाच एक भाग म्हणून मत्स्यशेती करण्यास उत्सुक असलेल्या मस्त्य शेतकऱ्यांची आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जलसाठे यांची माहिती संकलित करणे चालु आहे.तरी संबंधितांना भाजपा तर्फे मच्छिमार सेल चे संयोजक श्री.रविकिरण तोरसकर यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
भाजपाने भविष्यातील मत्स्यपालन व्यवसायासाठी आवश्यक भांडवल पुरवठा,तंत्रज्ञान,शासकीय योजना,तज्ञ मनुष्यबळ व प्रशासकीय परवानगी याबाबत मार्गदर्शन करून दिले.