शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी क्वारंटाईन व्हावे…

200
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन ; पाच हजार रॅपिड किटची मागणी…

कणकवली, ता.२१: कोरोना पॉझिटिव्ह ठरलेले आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्र्यांसमवेत गेल्या दोन दिवसांत ठिकठिकाणी दौरे केले आहेत. त्यामुळे कोरोना प्रसार रोखण्यासाठी श्री.नाईक यांच्या सोबत असलेले सतीश सावंत, संदेश पारकर यांच्यासह शिवसेनेच्या अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी क्वारंटाईन व्हावे असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे. तसेच शासनाकडे 5 हजार रॅपिड टेस्ट किटची मागणी केल्याचेही ते म्हणाले.
श्री.नलावडे म्हणाले, श्री.नाईक यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर नाईक यांचे संपूर्ण घर सॅनिटाईज करण्यात आले आहे. त्यासोबतच नगरसेवक सुशांत नाईक यांचे घर आणि परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. कणकवली शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापला सहभाग घ्यायचा आहे.
श्री.नलावडे म्हणाले, पालकमंत्री उदय सामंत यांनी नरडवे धरण, एस.टी. स्टँड, भालचंद्र आश्रम संस्थान, वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान आदींसह विविध ठिकाणी भेटी-गाठी घेतल्या आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे संदेश पारकर, सतीश सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी होते. त्या सर्वांनी स्वतःची, आपल्या कुुंटुंबियांची तसेच कणकवलीकर जनतेची काळजी घेण्यासाठी 14 दिवस घरी क्वारंटाईन व्हायचे आहे.
नगराध्यक्ष म्हणाले, महिन्यापूर्वी शिवसेनेचे काही नेते, पदाधिकारी यांनी क्वारंटाईन न होणार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करा यासाठी निवेदने दिली होती. परंतु आम्ही सुडाचे राजकारण करणार नाही. कुठल्याही शिवसेनेच्या नेत्या, पदाधिकार्‍या विरोधात तक्रार करणार नाही. कारण कोरोना हा अतिसंसर्गजन्य असल्याने तो कुणालाही होऊ शकतो. त्यामुळे कोरोनामध्ये राजकारण आम्ही आणणार नाही. मात्र कणकवली शहरवासीयांच्या सुरक्षिततेसाठी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी क्वारंटाईन व्हावे असे आम्ही कळकळीचे आवाहन करत आहोत.
ते म्हणाले, कणकवली शहरात कोरोना समुह संसर्गाचा मोठा धोका आहे. त्यामुळे शहरासाठी 5 हजार रॅपिड टेस्ट किट दिल्या जाव्यात अशी मागणी शासनाकडे केली आहे. त्या किट लवकरात लवकर उपलब्ध झाल्या तर तापसरीच्या रुग्णांची तपासणी करणे आणि कोरोना आळा घालणे लवकर शक्य होणार आहे.

\