मालवण ता.२१: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त २२ जुलै रोजी येथील शिक्षक समितीच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात सेवा बजावणाऱ्या प्रशासकीय पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात येणार आहे.
यामध्ये मालवण पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, आशा व आरोग्य कर्मचारी तसेच तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. तर आरोग्य सेवक, सेविका यांना फिल्ड वर्क साठी फेस शिल्ड मास्क प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच मालवण तालुक्यातील पत्रकारांचाही सन्मान करण्यात येणार आहे. मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर, कार्याध्यक्ष रुपेश गरुड यांनी दिली आहे.