परशुराम उपरकर यांचा इशारा ; २३ जुलैपासून राबविणार जिल्ह्यात सह्यांची मोहीम
कणकवली.ता,२१: मुंबई-गोवा महामार्गाच्या नव्या कामात मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे.अनेक ठिकाणी महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. याविरोधात दाद मागण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मनसेच्यावतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय मनसेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकांची सह्यांची मोहीम घेण्यात येणार आहे,अशी माहिती मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे दिले.त्यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक दिले आहे.त्यांनी असे म्हटले आहे की,मुंबई-गोवा महामार्गाचे काम चुकीच्या पद्धतीने केलेले आहे.त्यामुळे महामार्ग पूर्ण होण्यापूर्वीच या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत,अनेक ठिकाणी भराव खचला आहे,संरक्षक भिंत फुटल्याचा प्रकार कणकवलीतील ठरला होता.या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही आता महामार्गाच्या सुरक्षिततेसाठी जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला असून,ही मोहीम २३ जुलै पासून सुरु करण्यात येणार असल्याचे उपरकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.