ग्रामस्थांच्या तक्रारी; महसूल विभागाकडून चारचाकी गाड्या व बैलगाड्यांवर कारवाई…
वेंगुर्ले,ता.२२:
शिरोडा व सागरतीर्थ परिसरात सध्या समुद्र किनाऱ्यावरील वाळू काढून चोरटी वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काल शिरोडा सर्कल चव्हाण यांनी अशी चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन चारचाकी गाड्या व चार बैलगाड्या पकडल्या, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत श्री. चव्हाण यांच्याकडून सविस्तर माहिती मिळालेली नाही. दरम्यान त्यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
लॉकडाऊन नंतर बांधकामांना सुरुवात होताच दगड, वाळू आणि सिमेंट याला मागणी वाढली. दगड आणि सिमेंट मिळत असून वाळू मात्र चढ्या दराने विकली जात आहे. सध्या रहदारी कमी असल्याने शिरोडा व सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर असलेली वाळू रातोरात गाड्या भरून चोरून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. काही स्थानिक राजकीय पुढारी यात आपली पोळी भाजून घेत आहेत. त्यांनी आपल्या छोट्या बोलेरो गाड्यांमधून ही वाळू वाहतूक सुरू ठेवली आहे. या बाबत ग्रामस्थांच्या तक्रारी झाल्याने काल सर्कल व तलाठी यांनी धाड टाकली असता किनाऱ्या लगत बेछूट वाळू काडून गाडीत भरणाऱ्यांना पकडण्यात आले. या मध्ये एका राजकीय पुढाऱ्याची गाडी असल्याने या प्रकरणी महसूल विभाग काय कारवाई करते याकडे शिरोडा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.