सतीश सावंत; राज्य सरकार मार्फत प्रयत्न करण्याची पालकमंत्र्यांकडे मागणी…
कणकवली ता.२३: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या जेईई-नीट सारख्या परीक्षांची केंद्रे सिंधुदुर्ग जिल्ह्यातच निर्माण होण्यासाठी राज्य सरकार मार्फत आपण प्रयत्न करावेत,अशी मागणी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात म्हटल्याप्रमाणे, बारावी परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश पात्रता परीक्षा होणार आहेत.वैद्यकीय क्षेत्राकडे वाढणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीट ही परीक्षा येत्या सप्टेंबर २०२० मध्ये होणार आहे.याच बरोबर अभियांत्रिकीसाठी जेईई ही परीक्षा सुद्धा होत आहे.राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश पात्रता परीक्षा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे परीक्षा केंद्र अद्यापही निर्माण करण्यात आलेले नाही.चालू वर्षी कोरोनाव्हायरस सात रोग प्रादुर्भाव थांबलेला नाही.तरीही विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने जिल्ह्याबाहेर परीक्षा देण्यासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांनी इतर राज्यात किंवा इतर जिल्ह्यात प्रवास करणे धोक्याचे ठरणार आहे.त्यामुळे पुढील राष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या परीक्षांची केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातच निर्माण व्हावीत,असे म्हटले आहे.