भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिका-यांची तहसिलदारांकडे निवेदनाव्दारे मागणी…
वैभववाडी/पंकज मोरे,ता.२३:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवैध वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने तब्बल चार महिने भुईबावडा घाट बंद केला आहे. मात्र घाटमार्ग बंद करुनही वाहनांची ये-जा सुरूच होती. या घाटमार्गावरील वाहतूक करुळ घाटातून सुरू आहे. त्यामुळे भुईबावडा दशक्रोशीतील जनतेला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तरी प्रशासनाने भुईबावडा घाट तात्काळ सुरू करावा. अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिका-यांनी वैभववाडी तहसिलदारांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
भुईबावडा घाट प्रशासनाने तब्बल चार महिने बंद करून यामार्गावरील वाहतूक करुळ मार्गे वळविली आहे. घाटात तीन ठिकाणी झाडे आडवी करून व मोठमोठे दगड टाकून रस्ता बंद केला आहे. मात्र घाटमार्ग बंद असूनही मोटारसायस्वार दररोज या घाटातून ये-जा करीत आहेत. तसेच आजारी रूग्ण असेल तर त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर व अन्यत्र ठिकाणी घेऊन जाण्यासाठी करुळ घाटमार्गाचा अवलंब करावाङ लागतो.
सध्या सर्व वाहतूक करुळ घाटमार्गे सुरू आहे. त्यामुळे प्रवासाचे अंतर, गाडी भाडे खूपच वाढले आहे. तसेच लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तू दुप्पट भावाने खरेदी करावी लागत आहे. तसेच भुईबावडा व आजूबाजूच्या गावातील जनतेला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तरी तात्काळ भुईबावडा घाट सुरू करावा. अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिका-यांनी तहसिलदार रामदास झळके यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
यावेळी वैभववाडी युवा मोर्चा अध्यक्ष किशोर दळवी, जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, राजेंद्र राणे, स्वप्नील खानविलकर, नवलराज काळे, अमोल मोरे, संतोष दळवी, संकेत सावंत, अमोल शिवगण, वैभव कोकाटे, समीर माईनकर व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो- वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांच्याकडे निवेदन देताना भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते.