आशिष शेलार; गणेशोत्सव जवळ आला,तरी चाकरमान्यांबाबत कोणताही ठोस निर्णय नाही…
मुंबई, ता.२४ : गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना कोकणातील चाकरमान्यांना गणपतीसाठी गावाकडे जाण्यासाठी सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही.केंद्राकडून रेल्वे गाड्यांची मागणी करण्यात आलेली नाही.ई-पास व इतर वाहतूक सुविधांचाही पत्ता नाही.सरकारला कोकणी माणसाची सगळ्या बाजूने कोंडी करायची आहे का ?,असा सवाल भाजपचे आमदार अॅड.आशिष शेलार यांनी केला आहे.
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.चाकरमान्यांना कोकणात जाता यावे,यासाठी लवकरात लवकर ठोस निर्णय घ्या.अन्यथा, ‘लालबागच्या राजा’च्या भक्तांप्रमाणेच कोकणी माणसाचीही बाप्पाशी ताटातूट होईल,असे शेलार यांनी म्हटले आहे.
कोकणातील बहुसंख्य ग्रामपंचायतींनी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना १४ दिवस क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे.उपलब्ध साधने व निधी याचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होणार असताना अन्न, गरम पाणी, शौचालये व औषधांसाठी ग्रामपंचायतींना विशेष निधी उपलब्ध करून दिलेला नाही. त्याबाबत साधा विचारही केलेला नाही किंवा बैठकही घेतलेली नाही. सरकारच्या या बेफिकिरीमुळे गावकरी आणि चाकरमानी यांच्यात दरी निर्माण झाली आहे, असा आरोपही श्री. शेलार यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात शेलार यांनी उपस्थित केलेले प्रश्न, १४ दिवस क्वारंटाइन व्हायचे झाल्यास ५ ऑगस्टपूर्वी चाकरमान्यांना कोकणात पोचावे लागेल. त्यासाठी लागणारे पास, वाहनांची सुविधा कशी व कधीपासून होणार? कधीपासून कधीपर्यंत प्रवासाला परवानगी असणार?, गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची रेल्वेची तयारी आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी तसे स्पष्ट केले आहे. मग राज्य सरकारने अजूनही रेल्वे गाड्यांसाठी मागणी का केली नाही?, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोफत अँटी बॉडी टेस्ट करून त्यांना प्रवासाची परवानगी का दिली जात नाही?, गणेशोत्सव साजरा करण्याबाबत सरकारने वेळीच निर्णय न घेतल्याने लालबागचा राजा मंडळाने गणपतीची प्राणप्रतिष्ठा न करण्याचा निर्णय घेतला. कोकणी माणसाचीही तशीच कोंडी करण्याची सरकारची इच्छा आहे का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.