एकनाथ नाडकर्णी; केसरकरांकडून पाच वर्षात १०० कोटीचा फक्त गाजावाजा…
दोडामार्ग ता.२५: गेल्या दहा वर्षात बांदा-दोडामार्ग रस्त्यावर निधी खर्च न केल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रस्त्यासाठी शंभर कोटी आणले,असा फक्त गाजावाजाचं केला.तर आताच्या पालकमंत्र्यांनी सुद्धा जानेवारीत रस्ता दुरुस्तीची घोषणा केली.मात्र प्रत्यक्षात कोणताही निधी त्या ठिकाणी खर्च झाला नाही,अशी टीका भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी केली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
त्यात म्हटल्याप्रमाणे,लॉकडाऊनच्या बुरख्याआड लपून आपली निष्क्रियता झाकण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या वृत्तीमुळे आज तालुक्यातील राज्यमार्ग मृत्यू मार्ग बनलेत आहे. बांधकाम विभागाने तर हा रस्ता जीवन प्राधिकरण ला जणू आंदणच दिला आहे.गेल्या चार वर्षात त्यांनी रस्त्याची जणू लक्तरेच काढली.स्थानिकांनी वेळोवेळी आवाज उठवूनही सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने दोन्ही विभागांनी रस्त्याची पुरती वाट लावली. माजी पालकमंत्री केसरकरांनी तर चार वर्षे रस्त्यासाठी 100 कोटी मंजूर असल्याचे तुणतुणे लावले होते.त्यांच्या काळात १०० कोटी सुद्धा पोहचले नाहीत.विद्यमान पालकमंत्री उदय सामंतांनीही पावसाळ्यापूर्वी रस्ता सुस्थितीत करण्याची घोषणा केलेली.मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी डांबराचा थेंबसुद्धा नाही पडला .त्यामुळेच रस्त्याची दुरावस्था कायम आहे.आज रस्त्यातील खड्ड्यामुळे वाहने चालवणे धोकादायक बनले आहे.रस्त्याला साईडपट्टीच नसल्याने अनेक मालवाहू वाहनांना अपघात झालेत.याला सर्वस्वी सत्ताधारी जबाबदार आहेत.