पालिका प्रशासनाची माहिती ; शहरवासीयांना दिलासा…
मालवण, ता. २६ : शहरातील ‘त्या’ खासगी ट्रॅव्हल्स मधून प्रवास केलेल्या शहरातील ६ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.
शहरातील एका खासगी ट्रॅव्हल्सने मुंबई ते कुणकावळे प्रवास करणारी एक महिला काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह सापडली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने त्या खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास केलेल्या सर्व प्रवाशांचा शोध घेत त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले. सर्वजण मुंबईहून आल्याने त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. स्वॅब घेतलेल्यांमध्ये त्या रुग्णाच्या चार नातेवाईकांसह शहरातील सहा जणांचा तर तालुक्यातील अन्य आठ जणांचा समावेश होता. यातील शहरातील सहा जणांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातील अन्य आठ प्रवाशांचा कोरोना तपासणी अहवाल सायंकाळपर्यंत प्राप्त होईल अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांनी दिली.