शिरोडा ग्रामपंचायत मधील अपप्रवृतीला विरोध..
वेंगुर्ला.ता,२६:
सध्या सर्वत्र फैलावत चाललेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारीचे भान राखून सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन व्हावे. तसेच शिरोडा ग्रामपंचायती मधील अपप्रवृती विरुद्धचे आंदोलन जास्तीत जास्त तीव्र व परिणामकारक होण्यासाठी सोमवार २७ जुलै २०२० रोजीच्या उपोषण आंदोलनाचे स्वरुप बदलण्यात आले आहे. साखळी पद्धती ऐवजी सदरचे उपोषण हे सोमवारी सकाळी ९ वाजता शिरोडा ग्रामपंचायत कार्यालया समोर बेमुदत सुरु होणार आहे, असे उपसभापती सिद्धेश परब यांनी प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केले आहे.
साखळी उपोषणमधील आंदोलनकर्त्यांच्या तब्येतीस कोरोना संसर्गच्या काळात अपाय होऊ नये हा देखील त्यामागील एक उद्देश आहे. त्यामुळे स्वतःच्या जीवितास धोका पत्करुन सिद्धेश परब व त्यांचे अन्य चार सहकारी शासकीय यंत्रणेकडून न्याय मिळेपर्यंत बेमुदत उपोषण आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या समर्थकांनी उपोषणस्थळी एकत्र न जमता फोनद्वारे, लेखी स्वरुपात, वृत्तांतमधून व समाज माध्यमांद्वारे शासकीय यंत्रणेकडे म्हणजेच तहसिलदार वेंगुर्ला, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, गटविकास अधिकारी पंचायत समिती वेंगुर्ला, पोलिस निरीक्षक वेंगुर्ला वगैरे यांचेकडे आपला निषेध नोंदवावा. सदर बेमुदत उपोषण आंदोलनातील घडामोडींबाबत सर्व समर्थकांना समाज माध्यमांमधून वेळोवेळी माहिती देण्यात येईल असेही सिद्धेश परब यांनी सांगितले आहे.