कणकवली.ता,२६: तालुक्यातील फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहत येथे दोन गटात जोरदार फ्रिस्टाईल हाणामारी झाली.पूर्वीच्या वादातून ही मारहाण झाली आहे. यात दोन्ही गटाच्या दहा ते पंधरा लोकांना मारहाण झाली आहे. यात जखमी झालेल्या मध्ये महिलांचाही समावेश आहे. ही घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहत येथील पिळणकर आणि दळवी असे दोन गट एका दुसऱ्यासमोर आले आणि मारामारी सुरू झाली. त्यात गाडीच्या काचाही फोडून नुकसान करण्यात आले. यावेळी या ठिकाणी असलेल्या महिलांना शिवीगाळ करून त्यांना मारण्यासाठी घरात घुसण्या पर्यंतची घटना घडली आहे. हाणामारीची घटना कळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव कोळी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फोंडा येथील नवीन कुर्ली वसाहत येथे पिळणकर आणि दळवी असे दोन गट आहेत.अधून मधून या दोन्ही गटात भांडण होत असत. आजच्या या भांडणानंतर झालेल्या हाणामारीत महिला जखमी झाल्या असून,रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटाचे लोक कणकवली पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. उशिरापर्यंत दोन्ही गटांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला नव्हता.