आँल इंडिया धनगर समाज जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांची मागणी..
वैभववाडी.ता,२७: पाळण्याची डोली हिच १०८ आरोग्य सेवा अशा विदारक स्थितीत वैभववाडी तालुक्यातील धनगर समाज हलाखीचे जीवन जगत आहे. सोयी सुविधां अभावी या समाजाची होणारी परवड थांबवा. मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्या. या मागणीचे निवेदन ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली, जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना दिले आहे. सदर निवेदन वैभववाडी तहसीलदार रामदास झळके, नायब तहसीलदार अशोक नाईक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यावेळी दाजी बर्गे, भारती बोडेकर, भिकाजी शेळके, गंगाराम शिंदे आदी उपस्थित होते.
खांबाळे धनगरवाडीकडे जाणारा रस्ता नसल्याने वाडीतील आजारी व्यक्तीला डोलीतून उपचारासाठी आणावे लागत आहे. या वाडीत जवळपास ७० ते ७५ घरे आहेत. या नागरिकांना चार ते पाच किमी पाय वाटेने पायपीट करावी लागत आहे. वाडी तेथे रस्ता हे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार सोयी सुविधांपासून वंचित राहिलेल्या तालुक्यातील धनगर वस्त्यांना रस्ता मिळावा. तांडा वस्ती सुधार योजना, दलित वस्ती योजना अशा विविध योजनेतून या समाजाच्या विकासाला निधी मिळू शकतो. शासनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हा समाज सद्यस्थितीत भोगत असलेल्या वनवासाची प्रत्यक्ष दखल घ्यावी. व त्यांच्या मूलभूत गरजा प्राधान्याने सोडवाव्यात असे निवेदनात नवलराज काळे यांनी म्हटले आहे.