संजू परब; शहरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन उद्याचा आठवडा बाजार बंद…
सावंतवाडी ता.२८: शहरात आढळलेल्या “त्या” कोरोना पॉझिटिव्ह दाम्पत्यावर शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेच्या वतीने योगय ती कारवाई केली जाणार आहे.अशी माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे दिली.दरम्यान याच पार्श्वभूमीवर उद्या होणारा मंगळवारचा आठवडी बाजार बंद राहणार आहे.याला व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. याबाबत त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली.यावेळी आरोग्य सभापती परीमल नाईक, नगरसेवक नासीर शेख,आनंद नेवगी,अजय गोंदावळे,बंटी राजपुरोहित उपस्थित होते.
श्री परब पुढे म्हणाले, संबंधित दांपत्य मुंबई ठाणे असा प्रवास करून शहरात आले मात्र याबाबत त्यांनी पालिकेला कोणतीही कल्पना दिली नाही.तसेच ते क्वारंटाईन न राहता शहरातील अनेक जणांच्या संपर्कात आले आहेत.दरम्यान त्यांच्या संपर्कातील सहा जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे.तर त्यांच्या हलगर्जीपणाचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे.त्यामुळे त्यांच्यावर पालिकेच्या वतीने कोणती कारवाई करावी यासंदर्भात चर्चा सुरू आहे.
ते पुढे म्हणाले, शहरातील हिच वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन उद्या होणारा मंगळवारचा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तसेच याच पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्याबाबत व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा काहीशी चर्चा आहे.त्यामुळे त्यांनीसुद्धा सकारात्मक विचार करून पालिकेला सहकार्य करावे,यासाठी मेडिकल वगळता अन्य दुकाने बंद ठेवून शहरातील हे संक्रमण रोखण्यास सहकार्य करावे,तसेच शहरातील काही बेकरी व्यवसायिक पालिकेने घालून दिलेल्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत.मास्क-हॅन्ड ग्लोज वापरणे बंधनकारक असताना त्याचा वापर या बेकरी व्यवसायीकांकडून होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने अशा व्यावसायिकांवर सुद्धा कडक कारवाई केली जाईल,असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, नारळी पौर्णिमा हा सण जवळ येत आहे. या सणानिमित्त येथील मोती तलावात नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. दरम्यान यावर्षी कोरोनाचे संकट लक्षात घेऊन शहरातील मोती तलावाच्या काठी नारळ अर्पण करण्यासाठी गर्दी करू नये,असेही आवाहन त्यांनी केले.