सुरक्षेसाठी मनसेकडुन मागणी ; प्रांताधिकार्यांकडुन पोलिस अधिकार्यांना आदेश…
सावंतवाडी,ता.२७: शहरात चितारआळी परिसरात असलेल्या कंटेन्मेट झोन मधील तीन बँकाचे व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता लक्षात घेता, हया बँका बंद करण्यात याव्यात, अशी मागणी आज येथील मनसेच्या पदाधिकार्यांकडुन प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे करण्यात आली. दरम्यान सुरक्षा लक्षात घेता, संबधित बँकांना तात्काळ कार्यालये बंद करण्याच्या सुचना द्याव्यात, अशा सुचना प्रांताधिकारी खांडेकर यांनी पोलिस निरिक्षक शशिकांत खोत यांना दिल्या.
याबाबत मनसेच्या पदाधिकार्यांचे परिसरात राहणार्या काही नागरीकांनी लक्ष वेधले होते. तसेच हया बँका सुरू राहिल्यास परिसरासह अन्य ठिकाणी कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगितले होते. त्यानुसार मनसेचे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार, जिल्हा परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू कासकर, शुभम सावंत आदी पदाधिकार्यांनी तशी मागणी केली होती. त्यानुसार संबधित तीनही बँका बंद करण्याच्या सुचना प्रशासनाकडुन देण्यात आल्या.