दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एकूण सोळा जणांची होणार तपासणी…
बांदा.ता,२७:
बांदा येथे सपाडलेल्या कोरोना बाधित तरुणाच्या संपर्कातील ३ अहवाल पॉझिटिव्ह मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी असे एकूण १६ जणांचे स्वॅब आज तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
वाफोलि येथील खासगी कंपनीत काम करणारे ३ व्यक्ती कोरोनाबाधित सापडले आहेत. यामध्ये बांदा, इन्सुली व मळगाव येथील व्यक्तींचा समावेश आहे. या कंपनीसाठी लागणारा कच्चा माल हा कोलकाता, धारवाड, चेन्नई, पुणे, मुंबई, दिल्ली येथून आणण्यात येतो. तर पक्का माल पुन्हा कोलकाता येथे पाठविण्यात येतो. आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे. त्यामुळे परराज्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने खबरदारी घेण्यासाठी येथील खासगी कंपनीला पत्र दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, कोरोनाचा समूह संसर्ग टाळण्यासाठी सदर कंपनी १४ दिवस पूर्णपणे बंद ठेवावी व संपूर्ण निर्जंतुकीकरण करून घ्यावी. निमजगावाडी येथील रुग्ण व नव्याने मिळालेल्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध अद्यापही सुरू असून संपर्कातील व्यक्तींनी स्वतःहुन पुढे यावे असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.