आरवली येथील गणेश घाट बांधकाम अपहार प्रकरण
वेंगुर्ला.ता.२७:
आरवली ग्रामपंचायत हद्दीतील गणेश घाट बांधकाम अपहार प्रकरणी आर्थिक व्यवहारात अनियमितता करणे व शासकीय निधीचा अपहार केल्यापकरणी भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण विभागाचे सीईओ राजन रेडकर यांची तक्रार संस्थेचे सहसचिव कुणाल किनळेकर व सदस्य राजाराम चिपकर यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिली आहे. त्या विषयावरून शिवसेना उपजिल्हापमुख आबा कोंडसकर यांनी फोन द्वारे आपल्याला धमकी दिल्याची तक्रार श्री. रेडकर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांच्याकडे करून कारवाईची मागणी केली आहे.
आरवली ग्रामपंचायतीत जिल्हा परिषदेच्या ‘‘गणेश घाट बांधणे‘‘ या बांधकामाची माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार बांधकाम झालेले नाही. असे असतानाही त्या जागेवर काम पूर्ण झाल्याचा शासकीय माहितीचा फलक लावून रु.१,७५,४२४/- खर्च दाखवून ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता करणे व शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे कोकण विभागाचे सीईओ राजन रेडकर यांची तक्रार संस्थेचे सहसचिव कुणाल किनळेकर व सदस्य राजाराम चिपकर यांनी दिनांक २० जुलै रोजी मा.डॉ.श्री. हेमंत वसेकर, भापसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, (ग्राप) जिल्हा परिषद यांची समक्ष भेट घेऊन केली. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याबाबत विनंती करून लेखी निवेदन सादर करण्यात आले.
सदर तक्रारीस अनुसरून दि. २३ जुलै २०२० रोजी दुपारी १२.२४ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर यांनी राजन रेडकर यांच्या मोबाईलवर कॉल करुन, सदर तक्रार ही मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दाखल झालेली आहे हे माहिती असतानाही सदर तक्रारीची माहिती राजन रेडकर यांचेकडून घेऊन, त्यांना या बाबत जाब विचारला. हा अधिकार नसतानाही क्लेरीफिकेशन मागून, तुम्ही या कामाची खात्री केली का? असे वायफळ प्रश्न विचारुन धमकावले.
सोशल मीडियावर व्हाट्सएपद्वारे फक्त तक्रार निवेदन व्हायरल झाल्यामुळे सरपंच आरवली ग्रामपंचायत यांची भ्रष्टाचार केल्या प्रकरणी बदनामी केल्याने आबा कोडस्कर हे राजन रेडकरांना जाब विचारत होते. तसेच आबा कोंडस्कर यांनी राजन रेडकरांशी फोनवर हुज्जत घालून मी माजी सभापती व उपसभापतीचे काम केले असल्याचे सांगून आवाज वाढवून जोरजोरात चिडून बोलत होते.
सदर ‘‘गणेश घाट बांधणे‘‘ हे काम आरवली सोन्सुरे येथे जिल्हा परिषदेच्या स्तरावर पूर्ण झालेले असून त्याबाबत आबा कोंडस्कर यांनी स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केली असून ते काम पूर्ण झाले असल्याची माहिती त्यांनी रेडकरांना दिली. परंतु मुळात गणेश घाट हे बांधकाम झालेच नसल्याने आबा कोंडस्कर यांना या कामाची माहिती असतानाही ते जाणीवपूर्वक खोट बोलत होते. आबा कोंडस्कर यांचा या तक्रारीशी प्रत्यक्ष काहीही संबंध नसताना, तक्रारदार राजन रेडकर यांना कॉल करुन, व्हायरल झालेल्या निवेदनाचा मुद्दा उपस्थित करुन, राजकीय पक्षाच्या पदाचा वापर करून तक्रारदारावर रुबाब दाखवून, सरपंच आरवली ग्रामपंचायत यांना या गंभीर प्रकरणातून वाचविण्याकरिता, राजन रेडकर यांनी केलेली तक्रार मागे घ्यावी या उद्देशाने धमकी देऊन दबाव आणला. आबा कोंडस्कर यांचे विरुद्ध फौजदारी धाकदपटशा केल्याप्रकरणी सखोल चौकशी होऊन त्यांचेवर दखलपात्र गुन्हा नोंद व्हावा याकरिता राजन रेडकर यांनी संस्थेच्या वतीने मा.जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग, मा.जिल्हा पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग व मा.पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांना लेखी तक्रार सादर केलेली आहे.