उपसभापतींचे आमरण उपोषण; जिल्हाध्यक्ष बाळा गावडेंचा पाठिंबा…
वेंगुर्ला.ता. २७ :
संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असताना सोशल डिस्टंसींगच्या नियमांचे उल्लंघन करुन तालुक्यातील शिरोडा ग्रामपंचायती मधील एका सदस्याच्या वाढदिवसाची पार्टी ग्रामपंचायत कार्यालयातच करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ आज वेंगुर्ला पंचायत समितीचे उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांच्यासह ५ नागरिकांनी शिरोडा ग्रामपंचायत समोर संबंधितांवर कारवाईसाठी आमरण साखळी उपोषणास सुरुवात केली आहे.
शिरोडा ग्रामपंचायत कार्यालयात ३० जून २०२० रोजी एका ग्रामपंचायत सदस्याच्या वाढदिवसानिमित्त मटन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर याबाबत सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत होता. जनता सर्वत्र कोरोनाच्या महामारीचा सामना करीत असताना ग्रामपंचायत कार्यालयातच अशाप्रकारच्या पार्टीचे आयोजन करुन कोव्हिड-१९ अंतर्गत शासनाने घालून दिलेल्या अटी, शर्तींचा भंग करुन सामाजिक जबाबदारीचे भान नसलेल्या शिरोडा ग्रामपंचायतीतील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांच्या विरोधात कारवाईसाठी आज वेंगुर्ला पंचायत समितीचे उपसभापती तथा शिरोड्यातील जागरुक नागरीक सिद्धेश परब यांच्यासह अमोल परब, शिवराम नाईक, नारायण गावडे, दत्तगुरु परब यांनी शिरोडा ग्रामपंचायतीसमोर साखळी उपोषणास सुरुवात केली आहे.
कोरोना कालावधीत अशाप्रकारे शासकीय कार्यालयात सोशल डिस्टंसिगच्या नियमांचे उल्लंघन करीत पार्टीचे आयोजन करणा-यांवर कारवाईची मागणी सिद्धेश परब यांच्यासह अन्य जागरुक नागरिकांनी निवेदनाद्वारे शासनाकडे केली होती. परंतु याबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने आज सोमवारपासून उपोषणास सुरुवात करण्यात आली. दुपारपर्यंत सुमारे २०० ग्रामस्थांनी सह्यांद्वारे उपोषणास आपला पाठींबा दर्शविला आहे. सामान्य नागरिक कोरोना महामारीमुळे त्रस्थ असताना जबाबदार लोकप्रतिनिधींकडून अशाप्रकारच्या होत असलेल्या कृत्यांना आळा बसावा व येथील नागरिकांना न्याय मिळावा यासाठी हे उपोषण करण्यात येत असून जोपर्यंत न्याय होत नाही तसेच शासनाकडून अपेक्षित उत्तर येत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच रहाणार असे सिद्धेश परब यांच्यासह अन्य उपोषणकर्त्यांनी सांगितले.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन या आंदोलनाला आपल्या पक्षाचा पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांच्या समवेत तालुकाध्यक्ष प्रसाद चमणकर, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, शाम सूर्याजी, प्राणिल भगत, चांद्रकांत साळगावकर उपस्थित होते. तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनीही पदाधिकारी यांच्या समवेत आंदोलन स्थळी भेट देऊन या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला आहे. यावेळी जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर उपस्थित होते.