बाधितांशी साधला थेट संवाद; रुग्णांना मिळणाऱ्या सोई-सुविधांबाबत केली चौकशी…
सिंधुदुर्गनगरी ता.२७: जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड -19 आयसोलेशन वॉर्डला प्रत्यक्ष भेट दिली.यावेळी त्यांनी कोरोना बाधीत रुग्णांशी थेट संवाद साधला आणि त्यांची विचारपूस केली.
यावेळी आयएमएचे डॉ. संजय केसरे, डब्लुएचओचे कंन्स्लटंट डॉ. तेजपाल सिंग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. नागेश पवार, डॉ. गावकर यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी रुग्णांना मिळत असलेल्या सोयी व सुविधांविषयी विचारपूस केली. कोविड – 19 वॉर्डमध्ये मिळत असलेल्या औषधोपचारांविषयी रुग्णांनी समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी यांनी आयसीयु वॉर्डलाही भेट दिली. ॲडमिशन, डिस्चार्ज व इतर सर्व प्रक्रियांची माहिती घेतली. ऑक्सिजनचा होत असणारा पुरवठा, व्हेंटिलेटर, मॉनिटर यांचीही पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी कोविड – 19 वॉर्डमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याच्या सूचनाही दिल्या.



