विरोधी पक्षगटनेते सुशांत नाईक यांची मागणी ; खासदार, पालकमंत्र्यांना निवेदन
कणकवली, ता.२७: सिंधुदुर्गात कोरोना बाधिताच्या घरापुरताच कंटेन्मेंट झोन करावा आणि सध्याचे सर्व कंटेन्मेंट झोन रद्द करावेत अशी मागणी नगरपंचायतीचे विरोधी पक्षगटनेते सुशांत नाईक यांनी खासदार, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे. कंटेन्मेंट झोनमुळे बाजारपेठ प्रभावित होत असून व्यापार उदीमावर मोठा परिणाम होत आहे. शहरात येणार्या ग्राहकांचीही गैरसोय होत असल्याचे श्री.नाईक यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात सध्या मोठ्या संख्येने कोरोना बाधित आढळत आहेत. त्यामुळे ते राहत असलेला भाग पन्नास किंवा 100 मिटरपर्यंत कंटेन्मेंट झोन केला जात आहे. यात राजकीय वादंगही घडत आहेत. दुसरीकडे बाजारपेठेत कोरोना बाधित आढळल्यानंतर तेथील पन्नास किंवा शंभर मिटरचा भाग सील केला जात आहे. दुदैवाने बाजारपेठ भागात कोरोना बाधित रूग्ण वाढत राहिले तर बाजारपेठ वारंवार बंद ठेवावी लागणाार आहे. अगोदरच कोरोनामुळे बाजारपेठेत मंदी आहे. ग्राहक येत नसल्याने व्यापारी वर्गाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तर ग्राहकांनाही दुकाने बंद असल्याने माघारी जावे लागत आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बाजारपेठेसह जिल्ह्यातील सर्वच कंटेन्मेंट झोन बंद करावेत आणि कोरोना बाधिताच्या घरापुरताच झोन करावा अशी आमची आग्रही मागणी आहे.